मुंबई: आरे कॉलनी येथे एका महिलेला ऑटोरिक्षामध्ये तिच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. जोहरा शाह (३२) असे तिचे नाव असून घातलेल्या ओढणीने तिने तिचा प्रियकर, रमजान शेख (२६) याचा गळा दाबून खून केला. त्यांनतर स्वतःच पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाह आणि शेख हे दोघे वर्षभर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, पवई आणि आरेच्या मध्यभागी असलेल्या फिल्टरपाडा परिसरात ते राहत होते. शेख उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा चालवत होता. मात्र, या दोघांचे आपापसांत पटत नव्हते आणि त्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडणे होत होती, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी देखील त्यांच्यात भांडण झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जोहरा शाह ही शेखसोबत लग्न करण्यास उत्सुक होती. जेव्हा ते एकत्र आले तेव्हा तिच्याशी लग्न करण्यास शेख याने होकार दिला होता. पण अलीकडे तो लग्नासाठी नकार देत जोहराच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करत होता. तसेच हा शाह ही विवाहित होती जिला पहिल्या पतीपासून सहा मुले होती.
दोन वर्षांपूर्वी ती पतीपासून विभक्त झाली. तिची दोन मुले शाह आणि शेख यांच्यासोबत फिल्टरपाडा येथे राहत होती. चार मोठी मुले उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी जोहराच्या आईसोबत राहत होती. शनिवारी या जोडप्यामध्ये जोरदार भांडण झाल्यावर पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शाहने शेखवर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला.
कडाक्याचे भांडण झाले आणि गळा आवळला-
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑटोमध्ये शाह ही मागच्या सीटवर आणि शेख हा चालकाच्या जागी बसून निघाले, आरे कॉलनीच्या पिकनिक पॉइंटजवळ असलेली बीट चौकीजवळ जाण्याचे ठरले मात्र त्यापूर्वीच दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले, शेख तिच्यासोबत पोलीस ठाण्यात येत नाही आणि त्यांच्या नातेसंबंधातील समस्या सोडवणार नसल्याचे म्हणल्याने शाह रागवली आणि तिने शेखचा गळा आवळत त्याला संपविले. त्यानंतर तिने पवई पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर तिला आरे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.