Join us  

अवयव कसे काढावे याची कार्यशाळा, राज्यातून ७० हून अधिक सर्जनची उपस्थिती

By संतोष आंधळे | Published: September 03, 2022 9:37 PM

राज्यात अशा पद्धतीची कार्यशाळा केवळ केईएम रुग्णालयातच आयोजित केली जाते

मुंबई : अवयवदानाची जनजागृती होत असताना डॉक्टरांमधील सर्जिकल कौशल्य वाढावे याकरिता राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था यांच्यातर्फे केईएम रुग्णालयात मेंदूमृत व्यक्तीमधील अवयव कसे काढावे, यावर २८ ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये राज्यातून ७० पेक्षा अधिक सर्जन यांनी उपस्थिती नोंदविली होती. या कार्यशाळेमुळे उपस्थित सर्जन यांना थेट मृतदेहावर शरीरातील अवयव कसे काढावे याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रशिक्षण दिले.

राज्यात अशा पद्धतीची कार्यशाळा केवळ केईएम रुग्णालयातच आयोजित केली जाते. ही कार्यशाळा युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन स्कूल ऑफ युरॉलॉजी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेली होती. त्यामध्ये डॉ. अरुण चावला, डॉ. आर. एस. सबनीस, डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. अजित सावंत, डॉ. उमेश ओझा, डॉ. जयेश दबालिया आणि डॉ. भूषण पाटील यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. याप्रकरणी, राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था यांच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले की, या कार्यशाळेत अवयव कसे काढावे याच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त पोटच्या शस्त्रक्रिया या विषयावरील कार्यशाळा डॉ. जिग्नेश गांधी यांनी आणि कान, नाक आणि घसा या विषयांवरील कार्यशाळा डॉ. हेतल मारफातीय यांनी त्या विषयातील सर्जन त्यांच्यासाठी आयोजित केली होती. मोठ्या संख्यने सर्जन या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

पुढची कार्यशाळा १३ ऑक्टोबर

पुढची कार्यशाळा १३ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली असून, याकरिता परदेशातून डॉक्टर शिकविण्याकरिता येणार आहे. या कार्यशाळेकरिता मृतदेह केईएम रुग्णालयातर्फे देण्यात आला असून, सध्याचे पोलीस सर्जन, न्यायवैद्यक शास्त्र विभाग आणि केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीत रावत यांचे यावेळी सहकार्य लाभले. 

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल