पेणमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे इको पार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:35 AM2022-09-19T06:35:40+5:302022-09-19T06:36:16+5:30
निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वन जमिनीवर जागतिक दर्जाचे इको पार्क तयार करण्यात येणार असून त्यासंदर्भात रविवारी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलावलेल्या या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, निसर्ग पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, निखिल गांधी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण आणि संतुलन यासंदर्भात वन विभाग सतर्क झाला असून, निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारले जाणार असल्याचे वनमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संतुलन ही सामाजिक जबाबदारी आहे, असे समजून काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच नवीनतम लोकोपयोगी प्रयोग म्हणून इको पार्कची संकल्पना साकारली आहे. वन कायदा व इतर नियमांची शहानिशा तसेच, आवश्यक ती पूर्तता करून इको पार्क महाराष्ट्रात व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान, याविषयातील अनुभवी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.