Join us

समाजमाध्यमावर व्हिडीओ टाकत तरुणानं संपवलं जीवन, रामदास कदम यांच्या भावावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 8:58 AM

Mumbai Crime News: कामाच्या ठिकाणी झालेला मानसिक छळ आणि धमक्यांमुळे एका तरुणाने समाजमाध्यमावर व्हिडीओ टाकत स्वत:चे  जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये घडली.

 मुंबई  - कामाच्या ठिकाणी झालेला मानसिक छळ आणि धमक्यांमुळे एका तरुणाने समाजमाध्यमावर व्हिडीओ टाकत स्वत:चे  जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये घडली. याप्रकरणी हॅथवे साईस्टार केबलचे मालक सदानंद कदम यांच्यासह व्यवस्थापक परेश शेट्टी आणि दीपक विश्वकर्मा विरोधात गुन्हा नोंदवत, कुरार पोलिस अधिक तपास करत आहेत. सदानंद कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू असून दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी आहेत.

मूळचा उत्तरप्रदेशच्या जोनपूरचा रहिवासी असलेला २२ वर्षीय चंद्रेशकुमार तिवारी हा मोठा भाऊ पवन आणि आईसोबत मालाड प्रतापनगरमध्ये राहायचा. कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज येथे असलेल्या टाटा प्ले येथे आठ महिने काम केल्यानंतर चंद्रेशकुमार हा एअरटेल कंपनीमध्ये सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह पदावर काम करू लागला. मात्र, कदम, विश्वकर्मा आणि शेट्टी यांनी त्याला अन्य कोणत्याही ठिकाणी काम करू देणार नाही, अशा प्रकारची धमकी दिली होती.

धमकीमुळे तिवारी तणावाखाली होता. गावच्या घराचे काम सुरू असल्याने मोठा भाऊ आईला सोबत घेऊन गावी गेला.  २९ ऑक्टोबरला तब्येत बिघडल्याने दोन दिवस कामावर जाणार नसल्याचे त्याने भावाला सांगितले. ३० ऑक्टोबरच्या दुपारी भावाने तिवारीला कॉल केला. मात्र त्याने घेतला नाही. बराच वेळ कॉल करूनदेखील काहीच प्रतिसाद न मिळाल्याने भावाने एका नातेवाइकाला घरी पाठवले. नातेवाइकाने काठीच्या साहाय्याने दरवाजा उघडताच तिवारी छताच्या लोखंडी अँगलला चादरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना धक्का बसला. नातेवाइकांनी तातडीने त्याला शताब्दी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. घटनेची वर्दी मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिवारीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. 

तिघांच्या धमकीमुळे  टोकाचे पाऊल पोलिस तपासादरम्यान तिवारीने आत्महत्येपूर्वी समाजमाध्यमावर टाकलेला व्हिडीओ त्याच्या मावशीच्या मुलाला दिसला. त्यानंतर, भाऊ पवनने कुरार पोलिस ठाण्यात जात कदम, शेट्टी आणि विश्वकर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या पोस्टमध्ये तिघांमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद आहे. हे तिघेही मुंबईत अन्य कुठेही नोकरी मिळू देणार नाही, अशी धमकी सतत देत होते, असा आरोप तरुणाने व्हिडीओमध्ये केला होता. हा व्हिडीओ तिवारीच्या कुटुंबाने कुरार पोलिसांना दाखवला आहे. त्या आधारे कदम यांच्यासह अन्य तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून पोलिस तपास करत आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी