Join us

धक्कादायक! बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 1:34 PM

बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून मुंबईतील तरूणीची हत्या करण्यात आली आहे.

मुंबई : बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून मुंबईतील तरूणीची हत्या करण्यात आली आहे. हिंदू तरूणीने 3 वर्षांपूर्वी एका मुस्लिम तरूणाशी विवाह केला होता. दोघांचाही धर्म वेगवेगळा असल्यामुळे त्यांच्या प्रेमात धर्म आडवा येणार नाही, हे लग्नाच्या वेळीच ठरले होते. मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम पण काळानुसार सगळे काही बदलत गेले. मुलीवर मुस्लिम प्रथा अंगीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र मुलीने या सगळ्याला नकार दिला असता तिची हत्या करण्यात आली. रुपाली असे मृत तरूणीचे नाव असून तिचा पती इक्बाल महमूद शेख याने भरदिवसा तिची हत्या केली. ही घटना मुंबईतील चेंबूर भागातील आहे. पोलिसांनी इक्बालला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. 

दरम्यान, लग्नानंतर रूपाली ही तिचा पती इक्बालच्या घरी राहायला आली होती. ती हिंदू प्रथांनुसार वावरत होती, मात्र इक्बालच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. सुरुवातीला इक्बाल रुपालीच्या बाजूने होता, पण हळूहळू त्याने रुपालीवर मुस्लिम चालीरीती पाळण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. रुपालीवर बुरखा घालण्याचा दबाव होता, पण तिने नकार दिला. लक्षणीय बाब म्हणजे रूपाली आणि इक्बाल यांना एक मुलगा देखील आहे. 

तरूणीचा जागीच मृत्यू मुस्लिम चालीरितींमुळे दोघांमधील वाद चिघळत चालला होता. रोजच्या वादामुळे रूपालीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. जवळपास 6 महिने ती तिच्या पतीपासून वेगळी राहिली. यादरम्यान रूपाली आणि तिचा पती इक्बाल यांच्यात संवाद व्हायचा मात्र मुस्लिम प्रथांमुळे वाद देखील होत होता. सोमवारी इक्बालने रुपालीला चेंबूर येथील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. भेटीनंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. सततच्या वादामुळे रुपालीने इक्बालकडे घटस्फोट मागितला. इक्बालने घटस्फोटास नकार दिला. दरम्यान, बाचाबाची सुरू झाली आणि इक्बालने रूपालीवर चाकून हल्ला केला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात सदर घटनेची माहिती तेथील स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी इक्बालला ताब्यात घेतले आहे. खरं तर रूपाली इक्बालची दुसरी पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या पत्नीला कोणतेही अपत्ये न झाल्यामुळे त्याने तिला घटस्फोट दिला होता.  

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईचेंबूरहिंदूमुस्लीम