Join us

कळंब समुद्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:13 PM

सोमवारी सकाळी स्वप्नीलचा मृतदेह वसईच्या भुईगाव किनार्‍यावर आढळला. 

मंगेश कराळे -नालासोपारा - वसईच्या कळंब समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेले तीन तरुण पाण्यात बुडाले. त्यांपैकी दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र स्वप्नील बावकर (२१) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी स्वप्नीलचा मृतदेह वसईच्या भुईगाव किनार्‍यावर आढळला आहे. 

तुळींज येथे राहणार्‍या तरुणांचा एक ग्रुप रविवारी दुपारी नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनार्‍यावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट खेळल्यानतंर दुपारी स्वप्नील बावकर (२१) हा तरूण समुद्रात अंघोळीसाठी उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याने मदतीचा धावा करताच त्याचे दोन मित्र त्याला वाचविण्यासाठी समुद्रात गेले. परंतु ते सुध्दा बुडू लागले. स्थानिक मच्छिमारांना ही माहिती मिळताच त्यांनी समुद्रात धाव घेतली आणि दोघांना बाहेर काढले. मात्र स्वप्नील पाण्यात वाहून गेल्याने तो सापडला नव्हता. दिवसभर त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सकाळी वसईच्या भुईगाव समुद्रकिनार्‍यावर स्वप्नीलचा मृतदेह आढळला. स्थानिकांनी वाचवलेल्या एका मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

टॅग्स :पाण्यात बुडणेमुंबई