मुंबई : शाळांच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे विद्यार्थी आणि शाळा त्रस्त झाल्या होत्या. त्यातच आता ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही अशा विद्यार्थ्यांना दहावी-बारावीचे निकाल देण्यात येणार नाहीत असा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत अर्ज भरताना ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, त्या विद्यार्थ्यांचेही अर्ज भरून घेतले जात आहेत. पण, हे अर्ज भरून घेताना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेतले जात आहे. दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांची महत्त्वाची वर्षे असतात. त्यामुळे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून हमीपत्राचा पर्याय मंडळाने दिला आहे.काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. अशा विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेताना निकाल लागेपर्यंत आधार कार्ड काढू, असे हमीपत्र घेतले जात आहे. पण, निकाल लागेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल अशा विद्यार्थ्यांना निकाल न देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आतापासून विद्यार्थ्यांना आधार कार्डसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक आधार कार्ड केंद्रे बंद आहेत. जिथे आधार कार्ड केंद्रे सुरू आहेत, तिथे खूप गर्दी असते. त्यामुळे शाळेजवळ अथवा शाळेत विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळावे, अशी मागणीही शिक्षक संघटनांनी केली आहे.
दहावी-बारावी निकालासाठी आधार कार्ड सक्ती, शाळांच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 6:25 AM