लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात संचमान्यतेच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये विसंगती आढळल्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने संचमान्यतेसाठी आधारची अट शिथिल केली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांची या प्रक्रियेत नोंद करण्यात येणार आहे. आता या निर्णयामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती टळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जुळलेले नाही; परंतु त्यांची नोंद शाळांमध्ये आहे त्यांची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख समक्ष भेट देऊन करणार असल्याचे विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील नियमित हजेरी ग्राह्य धरून संचमान्यता केली जाणार आहे. याखेरीस, आधार कार्ड का नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही, तरीही ते शाळेत येत आहेत. त्यांना संचमान्यतेत गृहीत न धरल्यामुळे त्याचा फटका शिक्षकांच्या मंजूर पदांना बसत आहे.
संचमान्यता म्हणजे काय?
संचमान्यता म्हणजे तुकडी व विद्यार्थिसंख्या यांच्या प्रमाणात शिक्षकांचा कार्यभार. हा कार्यभार विचारात घेऊन संचमान्यता केली जाते. ही संचमान्यता ३१ जुलैच्या विद्यार्थिसंख्येवर होत होती व दरवर्षी ऑगस्टमध्ये संचमान्यता दिली जात होती.
बोगस शिक्षकांसह विद्यार्थ्यांचाही घेणार मागोवा
1. संचमान्यतेसाठी सरकारने शाळांना दिलेली मुदत १५ जूनपर्यंत आहे.
2. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पडताळणीला वेग आला आहे. संचमान्यतेवरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली जाणार आहेत. परिणामी, दोघांच्याही माहितीची चौकशी व पडताळणी करण्यात येणार असून, या प्रक्रियेत खासगी शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे आता बोगस विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही शोध घेतला जाणार आहे.