राज्यातील २५ लाख विद्यार्थ्यांचे आधार अवैध, ३१ डिसेंबरपर्यंत मुदत; तांत्रिक अडचणींचा घोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:19 AM2022-08-21T08:19:57+5:302022-08-21T08:20:15+5:30
राज्यातील सर्व प्रकारच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवा
मुंबई :
राज्यातील सर्व प्रकारच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवा, यासाठी शिक्षण विभागाने शाळा आणि मुख्याध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यातील २५ लाख ३० हजार २१८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षीपासून आधार अपडेटचे काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झाले नसल्याने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. मात्र शिक्षक, मुख्याध्यापकांनाही आधार अपडेट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तेसुद्धा हैराण झाले आहेत.
तांत्रिक अडचणींनी हैराण
प्रशासनाने आधार अपडेट करण्याच्या सूचना शिक्षक, मुख्याध्यापकांना दिल्या असल्या तरी हे काम करताना येणाऱ्या अडचणींनी शिक्षक त्रासले आहेत. स्टुडंट पोर्टलला आधार माहिती अपडेट करताना त्यातील काही टॅब लॉक असल्याने नाव, जन्मतारीख अपडेट होत नाही. विद्यार्थ्यांनी आधार काढलेल्या मूळ सेंटरवरून नावामध्ये चुका झाल्याने त्या अपडेट करूनही बदलत नाहीत, अशा तक्रारी आहेत. आधार अपडेट करून वैध केल्यावरही मिसमॅचच्या संख्येतून ते वगळता येत नाहीत, अशा तक्रारीही आहेत.
...नाही तर वंचित राहणार
शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी लाभाच्या विविध उपाययोजना राबविल्या जातात. या योजना पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने आधार क्रमांक अपडेट करण्याबाबत गतवर्षीच कळविले आहे. मात्र, आधार कार्ड अपडेट करण्यास राज्यातील अनेक जिल्ह्यांकडून कुचराई होत असल्याचे सातत्याने दिसले आहे. प्रशासनाकडून सूचना देऊनही पहिली ते बारावीच्या २५ लाख विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नसल्याने या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
डिसेंबर २०२२ अखेर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी करण्याबाबत शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत. शाळा स्तरावर याबाबत पूर्तता करण्यासाठी शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही बाबी शाळेच्या मर्यादेपलीकडे आहेत. याशिवाय संच मान्यता, शालेय पोषण आहार या आवश्यक बाबी आधार नोंदणीची निगडित असल्याने अनुदानित आणि शासकीय शाळा काळजीपूर्वक काम करत आहेत, पण या तुलनेत अन्य शाळांचे काम खूपच कमी आहे. त्यामुळे अपूर्ण कामाची टक्केवारी जास्त दिसत आहे.
- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, मुख्याध्यापक महामंडळ.
राज्यातील आधार अपडेट स्थिती
एकूण विद्यार्थी : २ कोटी २४ लाख ५० हजार ४६९
आधार नोंदणीसह विद्यार्थी : १ कोटी ८९ लाख ९४ हजार ३६३
आधारविना नोंदणी विद्यार्थी : ३४ लाख ५६ हजार १०६
वैध आधार कार्ड : ८९ लाख २९ हजार ५२५
अवैध आधारकार्ड : २५ लाख ३० हजार २१८