खलील गिरकरमुंबई : टपाल खात्यातर्फे महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये सुरू करण्यात आलेल्या आधार केंद्रांचा लाभ लाखो जणांना होत आहे. राज्यात सुरू असलेल्या १,२९३ आधार केंद्रांचा लाभ एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत ११ लाख १० हजार २६५ जणांनी घेतला आहे.आधार कार्डसाठी नवीन नोंदणी केलेल्यांची संख्या १ लाख ५४ हजार ७९८ आहे, तर माहिती अद्ययावत करण्याचा लाभ ९ लाख ५५ हजार ४६७ जणांनी घेतला. पहिल्या वेळी नोंदणी करून आधार कार्ड तयार करणे पूर्णत: विनामूल्य आहे. एकदा आधार कार्ड नोंदणी झाल्यानंतर, त्यामध्ये बदल करायचा असल्यास नाममात्र ५० रुपये शुल्क आकारले जाते. ज्या मुला-मुलींनी वयाच्या ५व्या वर्षांपूर्वी व १५व्या वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले असेल, तर त्यांना पाचव्या वर्षी व १५व्या वर्षी हाताचे ठसे, डोळ्यांची बुब्बुळे आदी बायोमेट्रिक माहिती नोंदविण्यासाठी बदल करणे अनिवार्य आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यांच्यासाठी टपाल खात्यातर्फे अनेक शाळा, शाळांच्या परिसरात शिबिरे भरवून त्यांना नोंदणी व अद्ययावतीकरण करणे सुलभ जावे, यासाठी प्रयत्न केल्याची माहिती पोस्ट मास्टर जनरल (मेल्स अॅन्ड बीडी) गणेश सावळेश्वकर यांनी दिली.
मुंबई शहर, उपनगरात १९७ आधार केंद्रेआधार नोंदणी व अद्ययावतीकरणामध्ये नागरिकांना साहाय्य व्हावे, यासाठी महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये सुमारे २,१०० पेक्षा जास्त शिबिरे घेण्यात आली आहेत. नागरी वसाहती, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्या सहकार्याने आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची शिबिरे आयोजित केली जातात. ८ मार्चपासून आधार सप्ताह आयोजित करून विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शिबिरे पुढे ढकलण्यात आली असून, नियमित काउंटरद्वारे आधारचे काम करण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात १९७ आधार केंद्रे कार्यरत असून, ठाणे जिल्ह्यात ४७ केंद्रे आहेत.