मुंबई : आधार कार्डमध्ये मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी जोडणे आता अनिवार्य झाले आहे. तसेच बोटांचे ठसे व डोळ्यांचे फोटो बायोमेट्रिक पद्धतीने जोडणेदेखील गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी नागरिकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय डाक विभागातर्फे आता मुंबईत जागोजागी आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मुंबईतील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये ही आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत नागरिकांना आपले आधार कार्ड अपडेट करून घेता येणार आहे.
सुरुवातीला ज्या नागरिकांनी मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी आधार कार्डसोबत जोडला नव्हता अशांना आधार अपडेट करावे लागते. तर काही नागरिक घरचा पत्ता, जन्मतारीख व नाव बदलण्यासाठी आधार केंद्रांवर येत आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासन, केंद्र सरकार व बँकांच्या वतीने आधार अपडेट केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तर काहींनी भाडेतत्त्वावर आधार अपडेट केंद्र चालविण्यास घेतले आहे. मात्र या केंद्रांवरदेखील अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे नागरिकांचा आधार कार्ड अपडेट करण्यात वेळ वाया जात आहे. आधार कार्ड सक्तीचे केल्याने सुरुवातीच्या काळात सर्व नागरिकांनी आधार कार्ड बनवून घेतले. त्या वेळेस अनेकांजवळ मोबाइल नसल्याने आधार कार्डवर केवळ घराचा पत्ता टाकण्यात आला होता. मात्र आता आधार कार्डला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करण्यासाठी नागरिकांना आधार अपडेट केंद्र गाठावे लागत आहे. परंतु या केंद्रांवर आधार अपडेट करताना अंगठ्यांचे ठसे, डोळ्यांचे फोटो हे जुळवून घेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.