मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वरळी भागात विकासकामांची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी स्वत: कार चालवली. यादरम्यान अजित पवार त्यांच्या शेजारी बसले होते.
अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यातलं ट्युनिंग पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंनी स्वत: कार चालवत अजित पवारांना त्यांचा मतदारसंघ दाखवला. महालक्ष्मी रेड क्रॉस, वरळी, धोबी तलाव परिसराची दोन्ही नेत्यांनी पाहणी केली. आदित्य यांच्या मतदारसंघातील विविध कामांची अजित पवारांनी पाहणी केली. विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यातलं ट्युनिंग याआधीही दिसलं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात अजित पवारांनी आदित्य यांना सांभाळून घेतलं होतं. मुंबई महापालिका भेटीतही अजित पवारांनी आदित्य यांना सांभाळून घेतलं होतं. त्यानंतर आज सकाळी अजित पवार, आदित्य ठाकरे एकाच कारमध्ये वरळीतील विकासकामांचा आढावा घेताना दिसले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे.