Aaditya Thackeray News: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडले. तर महायुतीतील नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला.
पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, धारावी पुनर्विकासाला कोणाचाही विरोध नाही. आम्ही त्याला वेग दिला होता. जे काम आधीच्या सरकारने रखडवले होते. आम्ही हाच विचार करत होतो की धारावीकरांचा विकास कसा होईल. या सरकारमध्ये फक्त दुसऱ्यांचा विकास होत आहे. धारावीकरांचा विकास होतो की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. धारावीकरांना मूळ धारावीतच घरे मिळायला हवीत. मात्र, ते होत नाहीत याच गोष्टीला आमचा विरोध आहे. हे लोक मुंबई द्वेष्टे आहेत. खोटे बोलणारी लोक आहे. या भाजपाचे मन महाराष्ट्र विरोधी आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली.
...तेव्हा बहिणींची किंवा शेतकऱ्यांची आठवण झाली नाही
महायुती सरकारने मांडलेल्या गाजर अर्थसंकल्पाची चिरफाड जनता करत आहे. दोन वर्ष सत्तेत असताना यांना कधीही बहिणींची किंवा शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. ही तीच भाजपा आहे, जेव्हा दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसले होते. तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. त्यांना अतिरेकी म्हटले होते. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. महाराष्ट्रातही याच भाजपा सरकारने त्यांना अर्बंन नक्षलवादी म्हटले होते, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. आम्ही त्यांना आठ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. त्यातही त्यांनी १०० अटी घालून ठेवल्या आहेत. त्यानंतरही समजा ते दीड हजार रुपये मिळाले तरी आता दीड हजार रुपयांमध्ये काय होणार? भाजपा सरकारने महागाई करून ठेवली आहे. निवडणुकीत पराभव होईल, या भीतीने काहीतरी करायचे म्हणून सरकार काहीतरी घोषणा करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.