“टॅरिफमुळे देशाची आर्थिक पडझड, केंद्रीय अर्थमंत्री-PM मोदींनी बोलायला हवे”: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 23:29 IST2025-04-07T23:28:30+5:302025-04-07T23:29:02+5:30
Aaditya Thackeray News: अयोध्या परिसरात अदानी किंवा लोढा यांना दिलेल्या सगळ्या जमिनी घेऊन कारसेवकांना भाजपाने मोफत घरे बनवून द्यावीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

“टॅरिफमुळे देशाची आर्थिक पडझड, केंद्रीय अर्थमंत्री-PM मोदींनी बोलायला हवे”: आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray News: अमेरिकेने भारतासह विविध देशांवर 'जशास तसे' शुल्क आकारल्यामुळे भारतात महागाई वाढण्याची किंवा बेरोजगारीची कोणतीही जोखीम नाही, असे मत विविध अर्थतज्ज्ञांनी मांडले आहे. उलट यामुळे जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच वाढविण्याची भारताला ही संधी असल्याचे या अर्थतज्ज्ञांना वाटते. यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेचे तीव्र पडसाद जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात उमटलेले दिसले. यामुळे गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी यावर बोलायला हवे, अशी मागणी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, २ तारखेला यावरच मी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. देशाच्या संसदेचे अधिवेशन सुरू होते, त्यात केंद्रीय अर्थमंत्री किंवा पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहून टॅरिफमुळे आपल्या देशावर काय परिणाम होणार, हे सांगणे गरजेचे होते. विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल, सगळ्यांना एकत्र आणून आपल्या देशासमोर यामुळे कोणते आव्हान उभे राहणार आहे, हे सांगणे गरजेचे होते. परंतु, हे मोठे आव्हान समोर दिसल्यावर भाजपावाले हिंदू-मुस्लिम हा वाद करत त्यातच घुसले. आज बसलेला फटका साधारण २६ लाख कोटींचा आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
देशाला बसलेला फटका वाढत जाणार
देशाला बसलेला फटका वाढत जाणार आहे. किती कंपन्या बंद होणार आहेत, किती लोकांचे रोजगार जाणार आहेत, याचा अंदाज तरी केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांना आहे का, या सरकारने त्याचा विचार केला आहे का, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच महागाई वाढणार, बेरोजगारी वाढणार, हा सगळा टॅरिफचा घोळ चाललेला आहे, यावर केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही. यात राजकारण आणण्याची गरज नाही, वादविवाद करण्याची गरज नाही. आव्हान आहे हे सगळ्यांना माहिती आहे; परंतु, सगळ्यांना सोबत घेऊन चला, अशी अपेक्षा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि टॅरिफमुळे देशाची आर्थिक पडझड होणार आहे, यावर केंद्र सरकारकडे उत्तर नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या सगळ्यावर उत्तर नसल्यामुळे देशात दंगली घडवायच्या एवढेच चालणार आहे. सामान्य नागरिकांना काय फरक पडणार आहे, नोकऱ्या मिळणार आहेत का, जमिनी मिळणार आहे का, जशा अदानींना मिळतात, अशी विचारणा करत राम नवमी झाली आता हनुमान जन्मोत्सव आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयोध्येत ज्या जमिनी ट्रस्टच्या असतील किंवा मंदिराच्या आसपास असतील, अदानी किंवा लोढा यांना दिलेल्या आहेत, त्या सगळ्या जमिनी घेऊन कारसेवकांना मोफत घरे बनवून भाजपाने द्यावी, हीच इच्छा आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.