वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला अटक करण्यात आली आहे. मिहिरची आई आणि बहीण यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीरने वरळीत नाखवा दाम्पत्याला धडक दिली. यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान आता आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसेच "मिहीर शाह हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यात भरचौकात सोडा" असं म्हटलं आहे.
"माझ्याकडे शब्द नाहीत. यांना भेटल्यानंतर मन हलून जातं. अपघात होत असतात पण एवढी बेकार हिट अँड रनची केस ही हत्याच आहे. सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर राग, दु:ख हे सर्वच दिसतं. नरकातून राक्षस आला तरी अशाप्रकारची बेकार हिट अँड रन केस करणार नाही. त्यांना नुकसान भरपाई नको तर शिक्षा पाहायची आहे."
"मिहीर राजेश शाह हा राक्षसच"
"काल जरी तो शाह थांबला असता तरी एक जीव वाचला असता. पण त्याने फरफटत नेलं ते फार भयानक आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझं म्हणणं आहे त्याला कोळीवाड्यात भरचौकात सोडा. मिहीर राजेश शाह हा राक्षसच आहे. हे भयंकर कृत्य आहे. मनाला धक्का बसतो. सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे तर ६० तास का लागले? मिहीर राजेश शाहला काय शिक्षा होते हे पाहायला हवं" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
आम्ही दोघेही दुचाकीने घरी परतत असताना पाठीमागून जोरदार धडक बसली. मी खाली कोसळलो. माझी पत्नीही माझ्या पाठीवर आदळल्यामुळे तिला जास्त मार लागला नव्हता; मात्र चालकाने गाडीचा वेग वाढवून पत्नीला फरफटत नेले, असे वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांनी सांगितले. मी गाडी थांबविण्याची विनंती केली, पण त्याने माझे ऐकले नाही. वेळीच ब्रेक दाबला असता तर माझी पत्नी वाचली असती, असे प्रदीप नाखवा म्हणाले.
मासेमारी बंद असल्याने कावेरी नाखवा क्रॉफर्ड मार्केटमधून मासे घेऊन त्यांच्या भागात विकायला घेऊन येत असताना हा अपघात झाला. नाखवा दाम्पत्याचा मुलगा यश नुकताच शिक्षण संपवून नोकरीला लागला आहे. त्यामुळे त्यांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होता. माझा मुलगा त्याच्या आईचा लाडका होता. तो कामावरून घरी आला तेव्हा त्याला आईच्या मृत्यूबाबत सांगण्याचे धाडस झाले नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही प्रदीप यांनी केली.