“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कारवाई करा”; आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 06:24 PM2023-05-10T18:24:44+5:302023-05-10T18:25:17+5:30
Aaditya Thackeray News: इतके महिने थांबलो, आणखी काही तास थांबा सगळे चित्र स्पष्ट होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टातील निकालाबाबत म्हटले आहे.
Aaditya Thackeray News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकते दिले आहेत. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे.
तत्पूर्वी, आदित्य ठाकरे यांनी सत्तासंघर्षाच्या येणाऱ्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली. कसलीही धाकधूक नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री अनैतिक आणि असंवैधानिक आहेत. इतके महिने थांबलो, आता २४ तास थांबा सगळे चित्र स्पष्ट होईल, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. राज्यपाल रमेश बैस यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, तीन घोटाळ्यांची माहिती राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मुंबईत सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा
गेल्या सात-आठ महिन्यात प्रशासकाच्या अंधाधुंदी कामामुळे मोठे घोटाळे होते. बिल्डर कॉन्ट्रक्टरच्या सरकारने मुंबईत सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा केला आहे. अनेक नगरसेवकांनी याबाबत तक्रार केली आहे. मात्र कारवाई करण्यात आली नाही. राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत. मी त्यांना चर्चेला येण्यास सांगितले. मात्र ते येत नाहीत आहेत. ते कधी शेतात तर कधी गुवाहाटीला पळून जातात, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
दरम्यान, १६० कोटींची कामे २६३ कोटींना दिल्याचा आरोप करत, मुंबईतील काँक्रिटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळच्या लोकांना कंत्राट दिले आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.