Lokmat Digital Creator Awards 2023: एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड, सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुरू असलेली कायदेशीर लढाई, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय, यातच होऊ घातलेल्या आगामी निवडणुका यांमुळे ठाकरे कुटुंबाचा संघर्षाचा काळ सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच या सगळ्या परिस्थिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर थेट भाष्य करणे आदित्य ठाकरेंनी टाळले.
लोकमत डिजिटल क्रिएटल अॅवॉर्डच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरेंशी अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी थेट उत्तर देणे टाळल्याचे पाहायला मिळाले.
उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का?
एकूणच राजकीय परिस्थिती पाहता लोकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी प्रत्येक दिवशी धोरणांवर बोलत असतो. जे योग्य आणि अयोग्य आहे, त्यावर चर्चा करतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चा या वैयक्तिक आहेत. कोणाशी युती झाली पाहिजे किंवा नाही, हे वैयक्तिक आहे. आज देशातील परिस्थिती पाहता स्वतःला महत्त्व देताना लोक दिसत आहेत. स्वतःच्या पलीकडे अनेक विषय आहेत, जे लोकांसाठी महत्त्वाचे आहेत. आज लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत, त्या युती होण्यापेक्षा किंवा २० ते ५० वर्षांपूर्वी काय झाले, त्यावर चर्चा करून भांडतोय. भविष्यासाठी कुणीही चर्चा करत नाही, असे सांगत या प्रश्नाला बगल दिली.
दरम्यान, इलेक्ट्रिक बस, अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा, रस्ते कसे असावेत. मुंबईसारखे असावेत की जोशीमठसारखे असावेत, यावर कुणीही चर्चा करताना दिसत नाही. युती किंवा कुटुंबातील गोष्टी या अंतर्गत असतात. मात्र, सामान्य जनतेच्या समस्यांची कुणीच गोष्ट करत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"