Join us

हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:26 IST

Aaditya Thackeray News: बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे. तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा घेतो. दोघांचा फायदा, असे सांगत आदित्य ठाकरेंनी महायुतीवर टीका केली.

Aaditya Thackeray News: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. यातच आता ठाकरे गटाची हिंदी सक्तीवर भूमिका काय, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले.

हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शिक्षण धोरणातील तरतुदींना पाठिंबा दर्शवला असून, महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मनसेने आक्रमक पद्धतीने भूमिका मांडली असून, प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यातच आता आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 

प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे मत स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलेच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे ती इंग्रजी. कारण ही जागतिक भाषा आहे. तिसरी भाषा मग हिंदी असेल किंवा इतर कोणती हे शिकणे महत्त्वाचे आहे. कारण ज्यांना जास्तीत जास्त भाषा येतात त्यांची प्रगतीही जास्त होते. आपल्याकडे सर्वांत कठीण परीक्षा कोणती असते तर ती यूपीएससीची. तुम्ही कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याकडे पाहा. त्यांना मातृभाषा येते इंग्रजी येते, हिंदी येते आणि ते ज्या ठिकाणी सेवेत असतात तेथील स्थानिक भाषाही येते, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले.

दरम्यान, या निर्णयाकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहायचे असेल तर योगायोग बघा, परवा ज्या भेटी-गाठी झाल्या, एकमेकांना आधार देण्यासाठी असतील. एकमेकांना आयडिया देण्यासाठी असतील. यातून एकच दिसते, कदाचित असा डाव असू शकतो, बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे. नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा घेतो. दोघांचा फायदा लोक मरतील यात आपले काय. आपले तर नीट चालेल असा विचार असू शकतो, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

 

टॅग्स :आदित्य ठाकरेआदित्य ठाकरेशिक्षणशिवसेना