मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. यानंतर आता विखुरलेला पक्ष सावरण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. यातच मुंबईत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. ज्यांचे रक्त भगवे तेच उद्धव ठाकरेंसोबत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली आहे. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भायखळ्यातील बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी या यात्रेची सुरुवात केली.
आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला धोका दिला
आम्ही सगळीकडे फिरत आहोत. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, ते जातील. पण मूळ नागरिक आहे, जो शिवसैनिक आहे. ज्यांचे रक्त भगवे आहे; ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला धोका दिला. कदाचित आमच्याकडून राजकारण कमी झाले असेल. समाजकारणात मात्र आम्ही कोठेही कमी पडलो नाही. ज्यांना परत शिवसेनेत यायच असेल, त्यांना दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना वाटतेय की तिकडे त्यांचे भले होईल तर तिथेच थांबावे. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसाठी लोकांसमोर यावे. जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रीय
शिवसेनेवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी आपापल्या भागात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही स्थिती दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा महत्त्वाची मानली जात आहे.