मुंबई: शिवसेनेने आपला २५ वर्षांचा साथीदार भाजपला दूर सारून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत युती करून सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या या निर्णयावरून भाजपकडून सातत्याने टीका केली जाते. शिवसेनेने पंतप्रधान मोदींच्या नावावर मते मागितली व आमदार निवडून आणले. त्यानंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस व राष्ट्रवादीशी मिळून सरकार बनवले. बाळासाहेब असते तर शिवसेनेने ज्यांच्याशी संघर्ष केला त्या काँग्रेससोबत केलेली युती पाहून त्यांचे मन व्यथित झाले असते, या शब्दांत भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधला जातो. याला आता युवासेना नेते आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे सरकार पाहून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी जपलेल्या जुन्या नात्यांच्या आठवणी सांगितल्या. बाळासाहेब आणि पवार साहेबांची मैत्री ही तेव्हापासून होती. वर्षानुवर्षे होती. मला असे वाटते की, आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे. एक युती झालीय, मैत्री झालीय ती बघायला मोठे साहेब (बाळासाहेब) असायला हवे होते. त्यांना ही युती पाहून आनंद झाला असता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही
बाळासाहेब, पवार साहेब. महाजन ही सगळी मंडळी राजकारणात अग्रेसर होती. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय व्यासपीठावरून टोकाची टीका, आरोप- प्रत्यारोप केले जायचे. मात्र पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. मैत्री विसरले नाहीत. खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला टोला लगावला. आज मोठे साहेब (बाळासाहेब) असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता. कारण त्यांच्या मित्राबरोबर (शरद पवार) युती आणि एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राला एकजूट करण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे स्टायलिश नेते होते. केसांची स्टाइल ते स्वतः निवडायचे. वयाच्या ८०-८२ वर्षात त्यांनी केस वाढवायला सुरुवात केली होती. फोटो काढतेवेळी पोझ कशी द्यायची, कपडे कोणते घालायचे, हेदेखील ते ठरवत असत, अशा काही आठवणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आजही मनात आदर आहे. आता पक्ष वेगळे असले, दिश, भूमिका विचार वेगवेगळे असले तरी राजकारणापलीकडे जाऊन कोणावरही तसेच कोणाच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका करणार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.