मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी जे विरोध करत आहेत. त्यांना ज्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांना ठेवले होते, त्याच तुरुंगात पाठवायला हवे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपण इतिहासावर किती दिवस बोलणार, असा सवाल संजय राऊतांना केला आहे.
संजय राऊत यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केले पहावे लागेल. संजय राऊतांची मते ही वयक्तिक असतात. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना-काँग्रेस आघाडी मजबूत आहे आणि आम्ही राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहेत. काही मुद्द्यांवर आमचे विचार वेगवेगळे असू शकतात. हीच तर लोकशाही आहे. इतिहास व्यतिरिक्त सध्याच्या मुद्यांवर चर्चा केली पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, "कोणाला भारतरत्न देण्याचा अधिकार भाजपाच्या हातात आहे. ते देऊ शकतात. मात्र, आता भुतकाळावर चर्चा झाली नाही पाहिजे. इतिहासावर जास्त चर्चा झाली आहे. इतिहासाकडून शिकावे, प्रेरणा घ्यावी आणि आजचे प्रश्न सोडवावेत. मात्र, सावरकरांसारखे महापुरुष ही रत्नेच आहेत. त्यांनाही असे वाद पाहून वाईट वाटेल. देशात जे काही सध्या चालले आहे. ते बघुन महापुरुषांना लाज वाटेल."
याशिवाय, मी सर्वांना सांगू इच्छितो की, इतिहासावर बोलू नका. सर्व व्यक्ती महान होत्या. आम्ही त्यांचा आदर करतो आहे. आताचे जे मुद्दे आहेत. बेरोजगारी, जीडीपीत घसरण, अर्थव्यवस्था ढासाळली आहे, कामे होत नाहीत यावर आपण बोलले पाहिजे. त्यामुळे मी सर्वांना सांगतो की, इतिहास हा इतिहास राहू द्या, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, मुंबई नाइटलाइफबाबत माहिती न घेता विरोधक बोलत आहेत. आपण जे सुरु करतोय ते नाइट लाइफ नाही. मुंबई 24 तास ही त्यामागची कल्पना आहे. याला नाइट लाइफ म्हणा किंवा मुंबई 24 तास म्हणा. ड्राय डे आणि मुंबई 24X7 मध्ये काहीही संबंध नाही. लंडनची नाइट टाइम इकॉनॉमी 5 बिलीयन पाऊंडस् आहे. हॉटेल्स, मॉल खुले राहिले तर बेस्ट, ओला, उबर, टॅक्सी सुरु राहतील. मुंबईत रोजगांर वाढवण्याच्या दृष्टीने मुंबई 24 तास सुरु ठेवणे ही संकल्पना आहे. मॉल, मिल कपाऊंड परिसरात कुठेही रहिवासी परिसर नाही. त्यामुळे, रहिवाशांना याचा त्रास होणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, सावरकरांना भारतरत्न देण्यास जे विरोध करतात, त्यांना अंदमान-निकोबारमध्ये असलेल्या त्याच तुरुंगात पाठवल्यास सावरकरांनी भोगलेल्या यातना त्यांना समजू शकतील, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावत वाद ओढवून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांच्या सावरकरविरोधी वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कटुता आली आहे.