Join us

Aaditya Thackeray Live: “गेल्या ७५ वर्षांत इतके भयानक सरकार कधीही पाहिले नाही”: आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:04 AM

Aaditya Thackeray Live: तुमच्या माथी गद्दरांचा शिक्का, तो कधीही पुसला जाणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Aaditya Thackeray Live: मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी हे सरकार कोसळणार. गद्दारांचे सरकार अल्पायुषी आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. गद्दारांचा गेम ओव्हर झाला आहे. गेल्या ७५ वर्षांत एवढे भयानक सरकार कधीही पाहिले नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. शिवसंवाद यात्रेदरम्यान मुंबईतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. 

या शिवसैनिक निर्धार मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी अनेकविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. देशातील वातावरण लोकशाहीसाठी घातक होत चालले आहे. हे सरकार मुंबई विकायला निघाले आहेत. महाराष्ट्रात अंधःकारात नेत आहेत. राज्याला मागे खेचण्याचे काम सुरू आहे. उद्योग क्षेत्र बंद करण्याचे काम सुरू आहे. स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या ७५ वर्षांत इतके भयानक सरकार पाहिले नाही, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना

मुंबईभर पोस्टर लावून पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. किती खर्च करायचा तो करू द्या. सामान्य शिवसैनिकांना हे सरकार घाबरत आहे. या भीतीमुळेच विविध यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. काही झाले तरी शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना आहे, असे नमूद करत, तुम्ही आमचे कितीही नाव चोरले, पक्षचिन्ह चोरले तरीही जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद चोरू शकत नाही. तुमच्या माथी गद्दरांचा शिक्का, तो कधीही पुसला जाणार नाही. माझ्या मनात केवळ सत्यमेव जयते, सत्यामेव जयते नाही. आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर तुम्हाला फिरणे कठीण होईल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.  

मुंबई महानगरपालिकेतील ठेवींमुळेच मुंबईकरांना स्वस्तात मस्त सेवा

मुंबई महानगरपालिकेचे ९० हजार कोटींचे सरप्लस बजेट आहे. मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या हजारो कोटींच्या ठेवींमुळेच मुंबईकरांना स्वस्तात मस्त सेवा मिळत आहे. हा मुंबईकरांचाच पैसा आम्ही मुंबईकरांच्याच सेवेसाठी ठेवला आहे. जगात बेस्टसारखी सेवा कुठेही नाही, मुंबई महानगरपालिकेत आरोग्याची सेवा जगात सर्वोत्तम आहे, असे सांगत मुंबईतील रस्ते कामाचा ६ हजार ०८० कोटींचा घोटाळा समोर आणला. त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे मुंबईकरांचे साडेचारशे कोटी वाचले, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांना अनेक आव्हाने दिली. राजीनामा देण्यापासून ते निवडणुका लढवण्यापर्यंतचे आव्हान दिले. मात्र, त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. वेदांता फॉक्सकॉन असेल, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, दाव्होसमध्ये कोट्यवधी कसे खर्च झाले, असे अनेक प्रश्न त्यांना विचारले. मुख्यमंत्री जिथे जातात, तिथे एकच कॅसेट लावतात. कॅसेट बंद करून कामे करून दाखवा, नाहीतर चालते व्हा हे जनता सांगतेय. सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही. अनेक महानगरपालिकांमध्ये प्रशासक काम करतायत. प्रशासक मुख्यमंत्री कार्यालयाचेच फक्त ऐकतात, असा दावा करत, ठाणे फक्त शिवसेनेचे आहे. तिथे तुम्ही संघर्ष केला नाही. तर सामान्य शिवसैनिकांनी संघर्ष केला आहे, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदे