Join us

इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 5:30 PM

Aaditya Thackeray EVM News: भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची खात्री आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Aaditya Thackeray EVM News: देशभरात निवडणुकीच्या मतदारानासाठी ईव्हीएम मशीन वापरले जाते. विरोधक सातत्याने ईव्हीएम मशीनवरून केंद्र सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेकदा यावर स्पष्टीकरण देऊन विरोधकांना त्यांचे दावे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. यातच आता जगातील सर्वांधिक श्रीमंतांपैकी एक तसेच टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. इलॉन मस्क यांनी उपस्थित केलेल्या शंकेला ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी ज्युनिअर यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आहे. रॉबर्ट एफ केनडी ज्युनिअर यांच्या एक्सवरील पोस्टला इलॉन मस्क यांनी रिप्लाय दिला आहे. इलॉन मस्क म्हणतात की, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन काढून टाकायला हव्यात. एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. तसेच याचा वापर करू नये, असा सल्लाही एलॉन मस्क यांनी दिला आहे. यावर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

...तर काहीही होऊ शकते

आपण पाहिले की, इलॉन मस्क यांनी ईव्हीएमबद्दल ट्वीट केले. तसेच आम्ही सर्वजण ईव्हीएमबाबत बोलत आहोत. इलॉन मस्क यांचा तंत्रज्ञानाबद्दल एवढा विश्वास असूनही त्यांना ईव्हीएमबद्दल विश्वास नाही. तुम्ही जर फोनवरून ओटीपीने ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकते. आता मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात घोळ झाल्याची चर्चा आहे. यानंतर निवडणूक आयोगाने तेथील सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लोकांचा भाजपावर प्रचंड राग होता. त्यामुळे भाजपाला लोकांनी २४० वर आणले आहे. ईव्हीएम नसते तर २४० पर्यंतही पोहोचले नसते. भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. एकजण ४०० पारच्या घोषणेबद्दल बोलतो, तर दुसरे आणखी काही बोलतो. आता निवडणूक होऊन गेली आहे. लोकांनी त्यांना जागा दाखवली. इंडिया आघाडी २३७ वर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची पूर्णपणे खात्री मला आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.  

टॅग्स :एव्हीएम मशीनआदित्य ठाकरेआदित्य ठाकरेएलन रीव्ह मस्क