आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न? दिशा सालियान प्रकरणात होणार SIT चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 11:07 AM2023-12-07T11:07:14+5:302023-12-07T11:08:07+5:30
विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याभोवती दिशा सालियन मृत्यू प्रकरणात चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या दिशा सालियान हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची लवकरच एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून आज आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून उपराजधानी नागपूर येथे सुरुवात होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याभोवती चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक दिशा सालियान प्रकरणात चौकशी करणार असल्याचे समजते.
दरम्यान, या निर्णयाबाबत राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र खरंच आदित्य ठाकरेंची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी होते का आणि अशी चौकशी झाल्यास त्यातून काय निष्पन्न होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरण?
दिशा सालियान ही अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक होती. ८ जून २०२०ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. वर्कलोड जास्त असल्याचं तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहात होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिलं असता दिशा पडलेली दिसली.
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षीच केली होती. तसंच ज्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील त्यांनी ते द्यावेत असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.