Join us

“...तर ठाकरे गट मोठे आंदोलन करणार”; आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, पण मुद्दा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 20:05 IST

Aaditya Thackeray Group: या सरकारला सत्तेत येऊन ६ महिने झाले नाहीत तर राज्यात अशी परिस्थिती आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Aaditya Thackeray Group: महायुतीचे सरकार सत्तेत येईपर्यंत असे वाटत होते की, यांच्याकडे खूप पैसा जमा झाला आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की, काही दिवसांपूर्वी BMC कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर आला नाही. आता ST कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर येत नाही. फक्त ५७ टक्के पगार दिला. या सरकारला सत्तेत येऊन ६ महिने झाले नाहीत तर अशी परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेकडे राज्य सरकारची जवळपास १६ हजार कोटींची थकबाकी आहे. अशा प्रकराची थकबाकी असताना अनेक कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत. ST कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. ही वेळ आता कोणत्याही कर्मचाऱ्यांवर येऊ शकते, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होते, तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना जे लोक रस्त्यावर आणत होते, ते लोक आता शांत का आहेत? ते लोक का सरकारला का विचारणा करत नाहीत? एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोण उत्तरे देणार? असे एकामागून एक प्रश्न आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले.

...तर ठाकरे गट मोठे आंदोलन करणार

मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर संघटनेचा दोन दिवसांचा संप हा पुढे किती दिवस चालेल माहिती नाही. पण मी आवाहन करतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण असोसिएशनला भेट द्यावी आणि त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांवर तोडगा काढावा. कारण मुंबईत किती दिवस पाण्याचा त्रास सहन करायचा. मुंबईतील पाण्याच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? मुंबईतील पाणी प्रश्नाबाबत पुढील ४८ तासांत योग्य निर्णय सरकारने घेतला नाही तर शिवसेना ठाकरे गट मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, साठ हजार झाडे कापली जाणार आहेत. महाराष्ट्राचे वाळवंट करणार असे सरकारने जाहीर करावे. म्हणजे आम्ही विचारणार नाही. पीक विमा कंपन्या नेमका कुणाचा फायदा करतात हे देखील पहावे लागेल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेआदित्य ठाकरेशिवसेना