मुंबई : मुंबई उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवून अदानी कंपनीने सुरू केलेल्या लुटीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार वाढीव वीज बिलांबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरदेखील मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा अदानी इलेक्ट्रिसिटी (रिलायन्स एनर्जी) कार्यालयावर पश्चिम द्रुतगती महामार्गावर नेण्यात आला होता. त्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.अदानी इलेक्ट्रिसिटीचे सीईओ कपिल मिश्रा यांच्याबरोबर आमदार परब यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाची अदानीच्या वाढीव बिलांबाबत चर्चा झाली. अदानीने आपली चूक मान्य करून पुढील येणाऱ्या बिलात जातीने दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती परब यांनी दिली.या वेळी केलेल्या भाषणात आमदार परब यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला इशारा देताना म्हटले की, अदानीने पश्चिम उपनगरातील वीज ग्राहकांच्या दरात २५ टक्के रक्कम कमी न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल. मग अदानीचा बोजा-बिस्तारा बांधून त्यांना गुजरातमध्ये पाठविण्यात येईल. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अदानीच्या कार्यालयावर सेनेची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:08 AM