वांद्रेत आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची नासधुस; निर्मलनगर पोलिसात गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: October 19, 2022 03:45 PM2022-10-19T15:45:55+5:302022-10-19T15:46:40+5:30
वांद्रे पूर्व येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री काही लोकांनी नासधुस केली.
मुंबई : वांद्रे पूर्व येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री काही लोकांनी नासधुस केली. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १८ ऑक्टोंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. यातील तक्रारदार दीपक तांबे (५०) हे समाजसेवक असून त्याच परिसरात राहतात. त्यांना मारहाण व शिवीगाळ करत हा प्रकार करण्यात आला. त्यानुसार त्यांनी निर्मलनगर पोलिसाना तक्रार दिली आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.
आम आदमी पार्टीमुंबईत ताकदीने वाढत असून महाराष्ट्रासह मुंबईत सर्वत्र पाठिंबा वाढताना दिसत आहे. आगामी महानगरपालिकेत निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या मुंबई महानगर पालिकेत आप चा झेंडा फडकवला जाणार आहे. काँग्रेस आणि भाजपाला आपच यश पचवता आले नाही म्हणून कार्यालयाचे नुकसान करण्याची हिम्मत केली असून हे अत्यंत दुदैवी आहे, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले. भाजपाच्या पदरात समाजकंटकांचा भरणा आहे. काँग्रेस पक्ष संपला. त्यांच्यातील भ्रष्ट भाजपामध्ये सामील झाले आहेत असून जी चांगली लोक उरली आहेत ती आम आदमी पक्षात सामील होत आहेत. आपल्या पदरात पडलेल्या गैरव्यवहारांवरही अंकुश ठेवण्याइतपत नेतृत्व काँग्रेसमध्ये उरलेले नाही. पोलिसांनी या गुंडगिरीची तात्काळ दखल घ्यावी असे मत मेनन यांनी व्यक्त केले.