...माणसाने माणसाशी माणसासम वागणे; पुष्कर श्रोत्रीचे सामाजिक भान, वाढदिवशी सत्पात्री दान
By अतुल कुलकर्णी | Published: May 7, 2019 06:14 PM2019-05-07T18:14:19+5:302019-05-07T18:32:29+5:30
पुष्कर श्रोत्रीचा एक ‘उबंटू’ नावाचा मराठी सिनेमा आला होता. त्या सिनेमातील ही प्रार्थना...
- अतुल कुलकर्णी
पुष्कर श्रोत्रीचा एक ‘उबंटू’ नावाचा मराठी सिनेमा आला होता. त्या सिनेमातील ही प्रार्थना...
हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे...
भोवताली दाटला अंधार दु:खाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे...
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे...
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे... जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे...
समीर सामंत या गीतकाराने लिहिलेली ही प्रार्थना आणि कौशल इनामदार यांनी दिलेले संगीत, पुष्करच्या सिनेमात ही प्रार्थना आली गेली असे झाले नाही तर पुष्करने ही प्रार्थना कृतीत उतरवली. जाती, पातीच्या, धर्माच्या अधर्माच्या भींती पलिकडे जात माणुसकीचा धर्म पुष्करने जपला आणि स्वत:चा ५० वा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला.
त्याची तीन नाटकं सध्या रंगभूमीवर गाजत आहेत. ‘आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ फरफेक्ट मर्डर’ आणि ‘हसवा फसवी’ अशी ही तीन नाटके. या तीनही नाटकाचे एकाच दिवशी सकाळी ११, दुपारी ४ आणि रात्री ८-३० अशा वेळेत त्यानी प्रयोग केले. या नाटकांच्या तिकीट विक्रीतून जमा झालेल्या पैशातून त्याने तीन वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक मदत देत स्वत:चा वाढदिवस साजरा करणारा हा कलावंत म्हणूनच वेगळा ठरला आहे. पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दिवसभर तीन नाटकांचा हा सोहळा रंगला आणि प्रेक्षकही सकाळी ११ ते रात्री १२-३० पर्यंत नाट्यगृहात बसून राहिले. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘त्रिनाट्यधारा’ नंतरचा हा एक वेगळा विक्रमच म्हणावा. अभिनेते अतुल परचुरे, आनंद इंगळे, अजित परब, दिग्दर्शक अभिनेता सतीश राजवाडे, विजय पटवर्धन, योगिनी पोफळे यांची तीनही नाटकातील भूमिका भाव खाऊन जाणा-या होत्या. पुष्करने तीन नाटकातून सादर केलेल्या दहा ते बारा भूमिका पाहाणे हा एक वेगळाच आनंद होता.
या नाटकांना स्वत: चंद्रकांत कुलकर्णी, अजित रमेश तेंडूलकर, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेविका ज्योती अळवणी असे अनेक दिग्गज उपस्थित होते. विजय पाटकर, सुनील हर्षे, महेश खानोलकर, विशाल इनामदार अशा अनेकांची उपस्थिती होती. मात्र या अनोख्या प्रयोगाला पुष्करच्या पाठीवर थाप मारण्यासाठी का होईना, मराठीतील त्याच्या सोबत सतत वावरणा-या कलावंतांनी एक सदिच्छा भेट तरी तेथे द्यायला काहीच हरकत नव्हती... पुष्करच्या सामाजिक जाणीवेला त्यांनी दिलेली साथ असाच त्यांच्या उपस्थितीचा उल्लेख झाला असता... असो, गोऱ्यापान चेहऱ्याला काळी तीट उगाच नाही लावली जात...
पुष्करने ज्या तीन संस्थांना मदत केली त्यात, पहिली संस्था होती ठाण्यातील. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या वतीने रोडवर भीक मागणाऱ्या, शाळेत न जाणा-या, छोटी मोठी कामं करणा-या मुलांसाठी भटू सावंत हा अवलिया सिग्नल शाळा चालवतो. तीन हात नाका येथे एका गाडीत ही शाळा चालते.
दुसरी संस्था कोल्हापूरची चेतना अपंगमती विकास संस्था. पवन खेबुडकर हे या संस्थेचे प्रमुख. ही संस्था गतीमंद मुलांसाठी काम करते. या मुलांनी कागदापासून बनवलेले गणपती लोक विकत घेऊन घरी बसवतात तेव्हा या मुलांचे आणि संस्थेचे कौतुक करावे तेवढे कमीच.
तिसरी संस्था रंगभूमी, टीव्ही गाजवणा-या विशाखा सुभेदार यांची. कलाश्रय नावाने त्या संस्था चालवतात. म्हातारपणी कलावंतांना कोणी विचारत नाही, अनेकांना तर घरचे ही कोणी विचारत नाहीत. बाहेरच्यांचा तर विषयच नाही.
अशा या तीन संस्थांना पुष्करने प्रत्येकी दीड लाख रुपये देऊ केले तर शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. पराग अळवणी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी त्यात स्वत:चे ५० हजार घालून ही रक्कम दोन लाखाची केली. शिवाय कार्यक्रमास उपस्थित असणा-या संस्थांनी देखील स्वत:हून येथे या संस्थांना आर्थिक मदत केली आणि पहाता पहाता पुष्करचा वाढदिवस आभाळाएवढा झाला.
पुष्करच्या या उपक्रमाच्या आयोजनात स्वरगंधार संस्थेचे मंदार कर्णिक, सोहम् प्रतिष्ठानचे विनीत गोरे आणि जीवनगाणीचे प्रसाद महाडकर या तीघांनी दिलेली साथीचे अपार कौतूक. हल्ली सगळे आपल्याला तिकीट खिडकीवर किती गल्ला जमतो असा विचार करण्यात मग्न असतात मात्र या तिघांनी कित्येक दिवस राबून हा उपक्रम यशस्वी करण्यास केलेले सहकार्य ‘जगात अजूनही देव आहे’ या शंकर महादेवन यांच्या विधानाची आठवण करुन देणारे ठरले.
विशेष बाब म्हणजे या तीनही नाटकाच्या मध्यंतरात सोनाली कर्णिक यांच्या चौरस आर्ट कला अकादमी मधील छोट्या मुलांनी वरती दिलेली प्रार्थना म्हणून रंगत आणली. सकाळपासून रात्रीपर्यंत मिहिका ताम्हणकर, अर्थव कर्णिक, निशाद भाटवडेकर, नुपूर पाठक, आद्या सप्रे, चिन्मय महाले आणि वैदेही परांजपे ही छोटी मुलं प्रार्थना म्हणण्यासाठी रंगमंदिरात बसून होती.