मुंबई: आताच्या घडीला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ईडीच्या कोठडीत आहेत. मनी लॉंड्रिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचे सांगत नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना दिलासा देण्यास नकार दिला. यातच आता नवाब मलिकांना जामीन मिळवायचा असेल, तर ३ कोटींचे बिटकॉइन द्या, असा एक फोन नवाब मलिकांच्या मुलाला आल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी मलिकांच्या मुलाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमीर मलिक यांच्या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलीस स्थानकात इम्तियाज नावाच्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी इम्तियाजने दावा केला आहे की, तो नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली आहे. आरोपीने तीन कोटीची ही रक्कम बिटकॉइन्सच्या स्वरूपात मागितली होती. या व्यक्तीने अमीर यांना दुबईहून फोन केला होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अंतरिम सुटका करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने केलेली अटक कारवाई व त्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेल्या कोठडी आदेशाला आव्हान देणाऱ्या रिट याचिकेत अंतरिम सुटकेची मागणी करणारा नवाब मलिक यांचा अंतरिम अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. हा नवाब मलिक यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, दाऊदशी संबंधित जमीन व्यवहार केल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. कुर्ला येथील भूखंड हडप करण्याचा कट रचण्यात मलिक यांचाही हात होता. ३०० कोटी रुपयांचा भूखंड अगदी किरकोळ दरात मलिक यांनी खरेदी केला, असा ईडीचा दावा आहे. याप्रकरणी सुरुवातीला ईडी कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतर नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.