महापालिकेत विरोधी पक्षच नसल्याचा ‘आप’चा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:49 AM2021-01-09T01:49:20+5:302021-01-09T01:49:33+5:30
महाविकास आघाडीकडून सुरू आहे धूळफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सत्तेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे नाटक करीत असून मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
आपच्या नेत्या आणि दिल्लीतील आमदार आतिशी मर्लेना यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी मुंबई पालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी पूर्ण शक्तीनिशी उतरणार आहे. तीस वर्षे मुंबईत शिवसेना - भाजप युतीने राज्य केले. आता महाविकास आघाडी झाली असून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा एक प्रकारे सत्ताधारीच बनले आहेत.
राज्यात आणि मुंबईत सत्तेत असलेल्या शिवसेनेमुळेच मुंबईकरांचे जीवनमान खालावले आहे. प्रशासन कोलमडले आहे. मोठे कंत्राट मिळविण्यातच शिवसेनेला रस असल्याने स्थायी समितीत दिवसाला तीनशे प्रस्ताव मंजूर करण्याचा घाट घातला जातो. मुंबईकरांना आता नवीन पर्याय हवा असून त्यासाठी आप सज्ज असल्याचे आतिशी म्हणाल्या.
मुंबईतील आरोग्य व्यवस्था, शिक्षण आणि प्रदूषणाची समस्या मोठी बनली आहे. दहा वर्षांपूर्वी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ६० हजार होती. आता, ३० हजारांच्या खाली आली आहे. २०६ अनुदानित शाळा बंद झाल्या. शिक्षकांची भरती थांबली आहे. आरोग्य व्यवस्थेत ४७ टक्के पदे रिक्त आहेत. मुंबईसारखे मोठे बजेट नसतानाही आपने दिल्लीत उल्लेखनीय काम केले आहे. त्याच आधारावर आम्ही मुंबईकरांसमोर जाणार असल्याचे आतिशी म्हणाल्या.
निवडणूक लढवणार
दिल्लीतील आमदार आतिशी मर्लेना यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी मुंबई पालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी पूर्ण शक्तीनिशी उतरणार आहे.