मुंबई : मुंबईतील मोठा हरितपट्टा म्हणजेच गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी परिसर विकासासाठी खुला करण्याचे समर्थन तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी केल्यामुळे नागरिकांचा रोष ओढवून घेतला होता. यातून धडा घेऊन विद्यमान आयुक्त अजय मेहता यांनी सावध भूमिका घेतली आहे़ नागरिकांच्या सूचना विचार करूनच आराखडा तयार करण्यात येईल, असे संकेत मेहता यांनी दिले आहेत. सुमारे ३ हजार एकरवर वसलेला आरे कॉलनी परिसर आत्तापर्यंत बांधकाममुक्त होता़ मात्र मेट्रो कारशेड, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता अशा अनेक विकास प्रकल्पांमध्ये या हरित पट्ट्याला धोका निर्माण झाला आहे़ त्यातच आत्तापर्यंत ना विकास क्षेत्रात असलेल्या आरे कॉलनीचे द्वार सन २०१४-२०३४ या विकास आराखड्यातील शिफारशींमुळे विकासासाठी खुले करण्यात आले़ याचे तीव्र पडसाद उमटले. असंख्य त्रुटींमुळे या आराखड्याला राज्य सरकारने स्थगिती देत सुधारणा करण्याची मुदत दिली़ त्यानुसार आॅगस्ट अखेरीस सुधारित आराखडा सादर होणार आहे़ (प्रतिनिधी)
डीपीतून आरे कॉलनीला सूट?
By admin | Published: July 11, 2015 2:36 AM