‘आरे’वासीयांचा ‘व्होटबंदी’चा इशारा!
By admin | Published: February 18, 2017 07:02 AM2017-02-18T07:02:53+5:302017-02-18T07:02:53+5:30
मुंबईचे हरित फुप्फुस म्हणून ओळख असलेल्या आरेच्या जंगलात कारशेड हवी की झाडे, यासंदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
मुंबई : मुंबईचे हरित फुप्फुस म्हणून ओळख असलेल्या आरेच्या जंगलात कारशेड हवी की झाडे, यासंदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आरे वासीयांनी केली आहे. जे पक्ष यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार नाहीत, त्यांच्याविरोधात ‘सेव्ह आरे’ चळवळीअंतर्गत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ‘व्होटबंदी’चा प्रचार करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. या मोहिमेतून विविध सेलीब्रिटी, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला
आहे.
आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, सामान्य मुंबईकरांना भविष्यात शुद्ध हवा आणि आरोग्यदायी वातावरण हवे असेल, तर आरे वाचवण्याच्या मोहिमेत सामील व्हावे लागेल. याआधी २०१४ साली मुख्यमंत्र्यांनी आरेमध्ये मेट्रोची कारशेड होणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यात राष्ट्रीय हरित लवादानेही या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर सरकारी बाबूंची मक्तेदारी असलेल्या आयोगाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेत प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत शब्द देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला काहीच किंमत नसल्याची टीका मेनन यांनी केली.
आरेमधील कारशेड प्रकल्पामुळे येथील जैवविविधता धोक्यात येईल. काही प्रजातींचा शोध आरेतून लागल्याने येथील जैवविविधतेला अधिक महत्त्व आहे. सुमारे ३७ प्रकारची कंद येथे सापडतात. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांची हक्काची ही सार्वजनिक जागा काही धनदांडग्यांच्या हट्टापायी बळकावली जात असेल, तर त्याचा विरोध नक्कीच केला जाईल, असे मत कलाकार व सामाजिक कार्यकर्ते संजीव खांडेकर यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)