मुंबई : आदिवासी समाजामध्ये आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना एक देवता म्हणून पुजले जाते. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालघर, विरार-वसई, सफाळा, येऊर आणि आरेतील आदिवासी बांधवांसह सेव्ह आरेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन सेव्ह आरेचा नारा दिला.मेट्रो ३ च्या कारशेड प्रकरणी वृक्षतोडीविरोधात आरेमध्ये मोठे आंदोलन निर्माण झाले होते. यावेळी २९ आंदोलकांना तुरूंगवास भोगावा लागला. झाडांना वाचविण्यासाठी २९ आंदोलक तुरूंगवासात गेले, ही एक मोठी बाब असून यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. नवी तरूणपिढी ही पर्यावरण वाचविण्यासाठी पुढे यावी, यासाठी त्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशी भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केली.आदिवासी बांधव प्रकाश भोईर म्हणाले की, जंगलाचे अस्तित्व टिकून असल्यामुळे मानव जिवंत आहे. पृथ्वीवर जंगल आणि जीवसृष्टी असून ती जपणे आपले कर्तव्य आहे. आईने आपल्याला जन्म दिला, तर झाडे आपल्याला आॅक्सिजन देत आहेत. त्यामुळे आपण जिवंत आहोत. ज्याप्रमाणे आईला जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढेच झाडांनीही महत्त्व दिले पाहिजे.
आरेत ‘आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा’ जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:35 AM