सत्तेपुढे लाचार होत 'ते' सगळ्याच मुद्द्यांवर यू-टर्न घेतात; धनंजय मुंडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 07:54 PM2019-10-06T19:54:46+5:302019-10-06T19:55:05+5:30
फडणवीस सरकारनं आरेमधील झाडांची कत्तल केल्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका केली जात आहे.
मुंबईः फडणवीस सरकारनं आरेमधील झाडांची कत्तल केल्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका केली जात आहे. उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणा-या याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे मध्यरात्रीत 500 झाडे पाडली. प्रशासनानं मध्यरात्रीत झाडे तोडल्यानं नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनीही भाजपाच्या आडून शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.
शिवसेनेनं सत्तेत असतानाही कारशेडमधील झाडं तोडण्यास विरोध केला होता. एवढी झाडं तोडून झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुखांनी सत्ता आल्यावर बघू, असं म्हटल्याचा हवाला देत शिवसेनेवर कुरघोडी केली. कार्यकारी अध्यक्ष म्हणतात, झाडं तोडणाऱ्यांचे काय करायचे ते नव्याने सरकार आल्यानंतर ठरवू. खरं तर उद्धव ठाकरे यांचे नाव बदलून 'यू-टर्न' ठाकरे ठेवायला हवे. सत्तेपुढे लाचार होत सगळ्याच मुद्द्यावर ते यू-टर्न घेत असतात, अशी टीकाही धनंजय मुंडेंनी केली आहे.
तर दुसरीकडे शनिवारी सरकारनं कलम 144 लावून तिथे जाणारे रस्ते बंद केले होते. वृक्षतोड सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. वृक्षतोडीचे फोटो काढले जाऊ नयेत, म्हणून आंदोलकांचे मोबाइलही ताब्यात घेतले. वृक्षतोडीविरोधात आंदोलकांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शनिवारी फेटाळला. आरेतील स्थानिकांच्याही गाड्यांची तपासणी व चौकशी होत होती. प्रसारमाध्यमांनाही प्रवेशबंदी होती.