लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेला आरे दुग्ध डेअरीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नथू विठ्ठल राठोड (४२) याच्या कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एसीबीने त्याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. त्याच्या मालमत्तेबाबत अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदाराकड़ून ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी १४ मेपासून राठोड एसीबीच्या रडारवर होता. त्याने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच, २४ मे रोजी एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी पैसे देण्याची तयारी दाखवताच, राठोड याने तक्रारदाराला गोरेगाव दुग्ध डेअरी येथील कार्यालयात शिपाई अरविंद तिवारीला भेटायला सांगितले. त्यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.
राठोड २०१६ पासून आरेमध्येच कार्यरत होता. दरम्यान त्याने अनेकांकड़ून लाच घेऊन बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा संशय एसीबीला आहे. त्यानुसार त्याची अधिक चाैकशी सुरू आहे.
...........................................