Aarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:12 PM2019-09-17T17:12:33+5:302019-09-17T17:28:13+5:30
Mumbai Metro : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला अनेक स्तरावरुन विरोध दर्शवत पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबई: मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला अनेक स्तरावरुन विरोध दर्शवत पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, यासाठी शिवसेना, मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत मेट्रो सेवा अधिक सोयीस्कर असल्याचे सांगत आरेमधील मेट्रोच्या कारशेडला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शविला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्वित करत सांगितले की, माझ्या जवळच्या एका मित्राला तात्काळ रुग्णालयात जायचे असल्याने त्याने कार ऐवजी मेट्रोचा मार्ग स्विकारला. तसेच मेट्रोने प्रवास करुन रुग्णालयातून घरी परतल्यानंतर मित्राने मेट्रो खूप जलद आणि सोयिस्कर असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे प्रदूषणावर जास्तीत जास्त झाडे लावा हाच उपाय असून मी माझ्या बागेत झाडे लावली आहे, तुम्ही लावलीत का? असा सवाल उपस्थित करुन मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना टोला देखील लगावला आहे.
T 3290 - Friend of mine had a medical emergency, decided to take METRO instead of his car .. came back very impressed .. said was faster, convenient and most efficient .. 👍
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 17, 2019
Solution for Pollution ..
Grow more trees .. I did in my garden .. have you ❤️
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध केला असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुखांनीही या कारशेडविरोधात सूर आळवला असून, नाणारचे जे झाले तेच आरेचे होणार असे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध केला. ''काही काळापूर्वी नाणार प्रकल्पाबाबात असाच आग्रह धरण्यात आला होता. मात्र त्याचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. आता जे नाणारचे झाले तेच आरेचे होणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.
तसेच आरेमधील वृक्षतोडीविरोधात मनसेने अनेकदा आंदोलनं केली आहेत. यातच पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाने आरेतील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने शर्मिला ठाकरे व अमित ठाकरे यांनी आरेमधील वृक्ष कापण्याचा विरोध करण्यात येणाऱ्या आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले होते.