Aarey Forest : झाडं तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायला पीओकेत पाठवा- आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 08:01 AM2019-10-05T08:01:58+5:302019-10-05T08:09:07+5:30
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध केला आहे.
मुंबई - आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मेट्रो प्रशासनाने तातडीने वृक्षतोड करण्यास सुरुवात केल्याने पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर झाला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून कारवाईचा विरोध करत संताप व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी 'आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरे कॉलनीतील वृक्ष तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं. झाडांची कत्तल करण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवायला हवं' असं ट्विट केलं आहे.
The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and swiftly cutting down an ecosystem in Aarey is shameful and disgusting. How about posting these officials in PoK, giving them charge to destroy terror camps rather than trees?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
'आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोडीचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे' असं ट्विटही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
Many environmentalists and even many local Shiv Sena members from the vicinity have tried stopping this. More so the increased police presence and the way this deforestation is happening, @MumbaiMetro3 is destroying everything India said at the UN @UNEnvironment@UN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
AareyForest हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेडींगमध्ये आहे. 'पर्यावरणसंदर्भातील समस्या, प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण यासारख्या गोष्टींवर केंद्र सरकारने बोलण्यात काहीच अर्थ नाही. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पामुळे आरेच्या वनक्षेत्राचे नुकसान होत आहे. ही लढाई अहंकाराची लढाई असल्यासारखे काम मेट्रोकडून केले जात असल्याने या मेट्रोचा मूळ उद्देशच संपला' असल्याचं आदित्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
There’s no point for the Central government ministry of climate change to exist, or to speak about plastic pollution when the @MumbaiMetro3 senselessly destroys the Aarey vicinity. This ego battle taken up by Metro 3 is destroying the purpose of making it.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
मुंबई उच्च न्यायालयाने गोरेगाव येथील आरे मेट्रो कारशेडविरोधात दाखल याचिका शुक्रवारी फेटाळल्या. त्यानंतर रात्री मेट्रो कारशेडसाठी येथे वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. वृक्षतोडीला विरोध दर्शवत येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत निषेध केली. रात्री उशिरापर्यंत वृक्षतोडीच्या विरोधासाठी पर्यावरणप्रेमींची गर्दी वाढतच गेली. अखेर पोलिसांनी यातील काही पर्यावरणप्रेमींना ताब्यात घेतले. दरम्यान, येथे दोनशेहून अधिक झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. येथील वृक्षतोडीला विरोध म्हणून गेले काही रविवार पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही हा विरोध कायमच असल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पुन्हा पाहायला मिळाले. दरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे याप्रकरणी ट्विट करून झाडे तोडण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
The @ShivSena ‘s @sheetalmhatre1 ji & Shubha Raul ji at Aarey. Even @prabhu_suneel ji has been standing up for it with the citizens. Wonder why @MumbaiMetro3 is treating Mumbaikars like criminals and not listening to sensible demand of sustainable development. https://t.co/ZdjF8ttKTk
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
आरेत वृक्षतोड होत असल्याचे समजताच भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव येथील पर्यावरणप्रेमींसह सामाजिक संस्था, विविध ग्रुप, स्थानिकांनी येथे गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दाखल झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. वृक्ष तोडीस विरोध करण्यासाठी दाखल पर्यावरण प्रेमीना प्रकल्प स्थळी जाण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला. येथील गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला जात असतानाच पर्यावरणप्रेमी आणि पोलीसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी महापालिका, मेट्रो प्रशासन यांच्या विरोधात घोषणा दिल्या असून, तीनशे झाडे तोडल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे न्याय मिळत नाही तोवर घटनास्थळाहून बाहेर पडणार नाही, असा निर्धार पर्यावरण प्रेमींनी यावेळी केला.