प्रकल्पांमुळे आरेतील वनसंपदा धोक्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:50 AM2019-10-01T03:50:13+5:302019-10-01T03:50:25+5:30
आरे कॉलनीमध्ये ३५ प्रजातींच्या मुंग्या, सस्तन प्राण्यांच्या १९ प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरपटणारे प्राणी ४७, फुलपाखरांच्या ८५, झाडे व माड ८०, छोटी झाडे व झुडपे ३०० प्रजाती या आरेच्या जंगलात तग धरून आहेत.
मुंबई : आरे कॉलनीमध्ये ३५ प्रजातींच्या मुंग्या, सस्तन प्राण्यांच्या १९ प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरपटणारे प्राणी ४७, फुलपाखरांच्या ८५, झाडे व माड ८०, छोटी झाडे व झुडपे ३०० प्रजाती या आरेच्याजंगलात तग धरून आहेत. परंतु मेट्रो-३ कारशेडमुळे सुमारे २ हजार २३८ झाडे तोडली जाणार असून आरेच्या जैवविविधतेवर हातोडा मारला जाणार आहे. त्यामुळे आरेतील वनसंपदा धोक्यात येणार असल्याची भीती पर्यावरप्रेमींनी व्यक्त केली.
वन्यजीव संशोधक राजेश सानप यांनी यासंदर्भात सांगितले की, एखाद्या ठिकाणाचा बदल बघायचा असेल तर त्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो. यामध्ये, जमिन, पशू-पक्षी, कीटक, झाडे आणि इतर यांच्या राहणीमानात कोणता बदल झाला आहे, याचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु आरे कॉलनीमध्ये झालेला बदल म्हटला तर हिरवी चादर हळूहळू कमी होत आहे. त्याचा परिणाम हा जैवविविधतेवर होताना दिसून येतो. तसेच हिरवळ कमी झाल्यामुळे मानव-प्राणी संघर्षात वाढ होऊ शकते.
पूर्वी जंगलामध्ये झाडांवर असंख्य घुडब दिसायचे. मात्र, आता झाडांची संख्या कमी झाल्यामुळे घुडब या पक्ष्यांनी उंच इमारतीवर घरटी बांधण्यास सुरूवात केली आहे. परिणामी, काळानुसार अधिवासात होणाऱ्या बदलाप्रमाणे वन्यप्राण्यांनी स्वत:मध्ये बदल करून घेऊ लागले आहेत.
वनशक्ती प्रकल्पाचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले की, जिथे वृक्ष जास्त तिथे तापमान कमी हे शाळेमध्येच शिकविले जाते. आरेमध्ये एकाच ठिकाणावरची ३ हजार झाडे तोडली. तर त्याचा तापमानावर किती फरक पडणार, याचा अभ्यास केला पाहिजे. वृक्षतोडीनंतर जरी रोपे लावण्यात आली. तरी त्या रोपातून सावली मिळणार नाही. पक्ष्यांना राहण्यासाठी जागा मिळणार नाही. हवेत आॅक्सिजनची मात्रा कमी होईल. आरेमधून ओशिवरा आणि मिठी या दोन नद्या वाहतात. तसेच आरेमध्ये तीन तलाव असून विनाकारण जंगल नष्ट केले जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून विरोध दर्शविला जात आहे.