Join us

आरे हॉस्पिटलला नकारघंटा!

By admin | Published: July 17, 2017 1:42 AM

गोरेगाव पूर्वेकडील आरे येथील रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. रुग्णालयाचा ताबा घेणे पालिकेला

मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे येथील रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. रुग्णालयाचा ताबा घेणे पालिकेला उचित होणार नसल्याचे कारण देत, महापालिका आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे शासनाच्या दुग्धविकास विभागाकडे नकार दर्शविला आहे. त्यामुळे शासनाच्या आरोग्य खात्यानेच रुग्णालयाचा ताबा घेण्याची मागणी नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टने केली आहे.आरे रुग्णालयाचा ताबा महापालिकेला मिळावा, म्हणून २००९ सालापासून गृहनिर्माण, तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर पाठपुरावा करत होते. मात्र, त्यांचे प्रयत्न फोल ठरवित, महापालिकेने रुग्णालयाचा ताबा घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. दर्जेदार वैद्यकीय सेवेअभावी येथील आदिवासी बांधव आणि नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. बहुतेक नागरिक उपचारासाठी खासगी किंवा पालिकेच्या रुग्णालयात धाव घेत आहेत. आरेतील २७ आदिवासी पाडे आणि ४६ झोपडपट्ट्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी हे आरोग्य केंद्र तब्बल ११ एकर जागेवर वसले आहे. रोज शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी धाव घेतात, तरीही येथील १४ खोल्यांपैकी फक्त १ ते २ खोल्याच सुरू असून, आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे.तरीही रुग्णालयासाठी नगण्य आर्थिक तरतूद केली, तरी चांगली सेवा देता येईल, असा दावा नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी केला आहे. महापालिकेने ताबा घेण्यास नकार दिल्यानंतर, आता दुग्धविकास विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला रुग्णालयाचा भार सोपवावा, अशी मागणी कुमरे यांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना केली आहे.