आरे हॉस्पिटल पालिकेने ताब्यात घ्यावे, शासनाचे नवे परिपत्रक जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:10 AM2017-10-19T07:10:13+5:302017-10-19T07:10:31+5:30
गोरेगाव(पूर्व) आरेतील रुग्णालय महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने ताब्यात घेण्यास शासनाला नकार दिला होता. आता परत आरे हॉस्पिटल पालिकेने ताब्यात घ्यावे, असा नवा शासन निर्णय जारी झाला आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : गोरेगाव(पूर्व) आरेतील रुग्णालय महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने ताब्यात घेण्यास शासनाला नकार दिला होता. आता परत आरे हॉस्पिटल पालिकेने ताब्यात घ्यावे, असा नवा शासन निर्णय जारी झाला आहे. आरे हॉस्पिटल ताब्यात घेण्याच्या बाबतीत शासन आणि पालिका यांच्या टोलवाटोलवीत आरे येथील २७ आदिवासी पाड्यांतील आदिवासी बांधव आणि येथील सुमारे ७० हजार नागरिक मात्र भरडले जात आहेत.
आरे हॉस्पिटलचा ताबा शासनाच्या दुग्ध विभागाकडून घेण्यास महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग उदासीन आहे. आरे वसाहतीमधील आरे रुग्णालयात अपुºया सोयीसुविधांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आरे कॉलनीत २७ आदिवासी पाडे, ४६ झोपडपट्टीत ७० ते ८० हजार लोकसंख्या आहे. आरे रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने उपचाराअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आरे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आरे दुग्ध वसाहत गोरेगाव, मुंबई येथील आरे रुग्णालय इमारत, निवासी इमारत असे एकूण क्षेत्रफळ २१८५.७२ चौ. मी. मुंबई महापालिकेस हस्तांतरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने १५ फेब्रुवारी २०१६ रोजी शासन निर्णयही जाहीर केला होता. त्यानुसार आरे रुग्णालय दुग्ध विकास विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला हस्तांतरण करण्यात आले होते. यासाठी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी हॉस्पिटल पालिकेने ताब्यात घेण्यासाठी २००९पासून सातत्याने प्रयत्न केले होते. मात्र शासनाच्या निर्णयानंतर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आरे रुग्णालय हस्तांतरण करण्यास नकार देत असल्याचे महापालिका आरोग्य खात्याने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आरे रुग्णालय इमारतीची मिळकत पत्रिकेमध्ये ‘महाराष्ट्र सरकार’ अशी नोंद कायम राहणार असल्याने जागेची दुरुस्ती करणे महापालिकेस शक्य होणार नाही. इमारत अत्यंत दुरवस्थेत असल्यामुळे पुनर्बांधणी केल्याशिवाय जागा वापरात येणे शक्य नसल्याने तसेच रुग्णालयात नवीन कर्मचाºयाची नियुक्ती करणे व इतर बाबीचे आर्थिक कारण पुढे करून महानगरपालिका आयुक्त यांनी जागेचा ताबा घेण्यास असर्मथता दर्शवल्याचे २६ मे २०१६ रोजी शासनाच्या दुग्ध विकास विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले होते.
आरे कॉलनी हा परिसर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे आरेतील नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य सेवा पुरवाव्यात, असे मत विधिमंडळाच्या अंदाज समितीने मांडले होते. मात्र पुन्हा गेल्या महिन्यात दुग्ध विकास विभागाने १३ सप्टेंबर २०१७ रोजी शासन निर्णयाद्वारे दुग्ध विकास विभागाने आरेतील नागरिकांच्या हितासाठी आणि परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आरे रुग्णालय मुंबई पालिकेला हस्तांतरण करण्यास शासनाच्या महसूल व वनविभागाने ताब्यात देण्यास मान्यता दिली. मात्र अद्यापही महापालिकेने शासन निर्णयाबाबत कोणताच निर्णय न घेतल्यामुळे आरे कॉलनीतील नागरिकांचे उपचाराअभावी हाल होत आहेत, असे नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी सांगितले.
आरेतील जनता आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये म्हणून आपण स्वत: पुढाकार घेऊन इमारती आणि सध्या असलेल्या येथील सुविधांसाठी प्रयत्न केले आहेत. दुग्ध विभागाचे शासन परिपत्रक काढून सदर हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेण्याचा शासन आदेश परत जारी झाला आहे. मात्र अजून पलिकेकडून काही उत्तर आलेले नाही.
- महादेव जानकर,
दुग्ध व्यवसाय मंत्री
आरे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे, असे परिपत्रक पुन्हा दुग्ध विभागाने काढले आहे. त्यानुसार आपण हे रुग्णालय शासनाने ताब्यात घेण्यासाठी उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप पलिकेकडून याबाबतीत कोणतेही उत्तर आलेले नाही.
- नथु राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी,
आरे दुग्ध विकास विभाग
आरे रुग्णालयात कोणतीच सोयीसुविधा उपलब्ध नाही. पोलिओ डोस, थंडी, ताप इतर आजारांवर औषध देण्यात येते. मात्र सर्पदंशावर कोणतीच सुविधा आरे रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे सर्पदंश अथवा बिबट्याने हल्ला केल्यावर नागरिकांना पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या जोगेश्वरी येथील पालिकेच्या ट्रॉमा रुग्णालयात आणि गोरेगाव
येथील सिद्धार्थ रुग्णालयात जावे लागते.
- नामदेव झिंगाडे,
आरे युवक मंडळ