मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३च्या कारशेडसाठी राज्य सरकारने अखेर कांजूरमार्ग येथील जागेवर शिक्कामोर्तब केले असले, तरी २०१४ सालीच आरे संवर्धन समितीने ही जागा सुचविली होती. कारशेडच्या जागांबाबत स्थापन समितीनेही याच जागेचा पर्याय सुचविला होता. मात्र, अनेक गैरसमज, चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले मुद्दे अशा अनेक कारणांमुळे कांजूरमार्ग येथील जागा निवडण्यास तब्बल सहा वर्षे लागली, असे मत आरे संवर्धन समितीने मांडले.
मेट्रो-३ कारशेडसाठी आरेमधील झाडांवर नोटीस लागल्या, तेव्हा म्हणजे सुमारे सहा वर्षांपूर्वी आरे संवर्धन समितीने सात जागा सुचविल्या होत्या, अशी माहिती आरे संवर्धन समितीचे रोहित जोशी यांनी दिली. त्या सातही जागांची मालकी सरकारकडे होती. यात कांजूर, कलिना, कफ परेड, सारिपतनगर अशा जागा होत्या.
२०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या समितीने कारशेड कांजूरला हलवा, असे सुचविले. तत्पूर्वी २०१४ साली आरे संवर्धन समितीने अभ्यासाअंती, हीच जागा सुचविली होती. सरकारच्या मंजुरीनंतर आता येथील कामाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.