मुंबई - गोरेगावातील आरे कॉलनीत मृतावस्थेत आढळलेल्या अथर्व नरेंद्र शिंदे या 20 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. अथर्वच्या अंगावरील जखमा मारहाणीच्या आहेत की नशेत पडल्याने झाल्या आहेत, हेदेखील स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अथर्व शिंदे गेला होता, तेथे सहभागी झालेल्या जवळपास सर्वच तरुण मंडळींनी दारूचे तसंच ड्रग्सचे मोठ्या प्रमाणात सेवन केले होते. यामध्ये LSD ड्रग्सचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी पार्टीमध्ये सहभागी झालेल्या 12 जणांची साक्ष नोंदवली आहे.
'मुंबई मिरर'ला नाव जाहीर न करण्याच्या अटीवरुन पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व साक्ष नोंदवलेल्या एका 20 वर्षीय तरुणानं बंगल्यामध्ये त्या रात्री नेमके काय घडले याची माहिती दिली. या तरुणानं 'मुंबई मिरर'ला सांगितले की, आरेतील रॉयल पाम येथील बंगल्यात रविवारपासूनच वाढदिवसाची पार्टी सुरू होती. ज्या मुलीचा वाढदिवस होता, तिनं मला पार्टीसाठी बोलावले होते. ज्यावेळेस मी बंगल्यात पोहोचलो, त्यावेळेस बहुतांश जणांनी प्रचंड प्रमाणात दारू आणि ड्रग्सचं सेवन केले होते. बऱ्याच जणांनी LSD ड्रग्सचंही सेवन केले होते. काही वेळानंतर दोन जणांमध्ये शाब्दिक चकमक उडाली व वातावरण असुरक्षित वाटू लागल्यानं मी तेथून निघालो.
दुसऱ्या दिवशी अथर्व शिंदेचा आरे परिसरात मृतावस्थेत आढळल्याचे वृत्त समोर आले. त्याच्या मृत्यू प्रकरणाबाबत सहकार्य करण्यासाठी व पार्टीमध्ये नेमके काय घडले याची चौकशी करण्यासाठी पोलीस माझ्या घरी आले. पण मृत्यू प्रकरणाबाबत काहीही माहिती नसल्याचे मी पोलिसांनी सांगितले. तरीही त्यांनी पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. अथर्व शिंदे आरे परिसरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर मला समजली. तिथेच अथर्व वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी असल्याचं समजलं, मात्र माझी आणि त्याची भेट झालेली नव्हती. पोलीस स्टेशनमध्ये त्याचा फोटो पाहिला व त्यानंतर मला समजलं की तोदेखील पार्टीमध्ये हजर होता. मात्र पार्टीदरम्यान त्याचे कोणासोबतही वादविवाद झालेला मी पाहिला नाही.
नेमके काय आहे प्रकरण?
पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व शिंदेचा 9 मे रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. कांदिवली (पूर्व) परिसरातील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत असलेल्या अथर्वचे वडील मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत. तो ‘साउंड इंजिनीयरिंग’च्या तृतीय वर्षात शिकत होता. एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तो आरेतील रॉयल पाम येथील बंगल्यात रविवारी गेला होता. बुधवारी त्याच्या मृतदेह आढळल्याने पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-याचे फूटेज मिळविले आहे, त्यामध्ये रविवारी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास अथर्व पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडल्याचे दिसते. मात्र, नशेमुळे त्याला नीट चालताही येत नव्हते. त्याने अनेक रिक्षावाल्यांना थांबवत ‘मुझे कांदिवली छोड दो’, असेही सांगितले. मात्र, त्याची अवस्था पाहून हा कोणी गर्दुल्ला असावा आणि आपले रिक्षाभाडे आपल्याला मिळणार नाही, असा विचार करत त्याला कोणत्याही रिक्षावाल्याने गाडीत बसवले नाही. त्यानंतर जंगलातील एका खड्ड्याजवळ तो नैसर्गिक विधीसाठी गेला. मात्र, उतार असल्याने तो तोल जाऊन चार वेळा पडला. त्यानंतर उठून उभे राहण्याचे त्राणही त्याच्यात राहिले नाही. जखमी अवस्थेत पडलेल्या अथर्वला परिसरातील स्त्री-पुरुषांनी पाहिले. मात्र, तो दारूच्या नशेत पडला असावा, असा समज करून त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही आणि अखेर त्याचा मृत्यू झाल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे.स्थानिकांनी याबाबत वेळेतच पोलिसांना कळविले असते, तर कदाचित त्याच्यावर उपचार होऊन त्याचे प्राण वाचले असते. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पार्टीत सहभागी असलेल्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुप्तांगावर जखमाअथर्वच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्याच्या गुप्तांगालाही दुखापत झाली असून, त्यामुळे मृत्यू झाल्याचे सिद्धार्थ रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र, या जखमा मारहाणीच्या आहेत की नशेत पडल्यामुळे, याची स्पष्टता झाली नसल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.
बर्थडे पार्टीत पालकांचाही सहभागपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अथर्व ज्या पार्टीत गेला होता ती त्याच्या मैत्रिणीच्या एक बेस्ट फ्रेंडची होती. जी तिच्या वडिलांनी मुलगी १८ वर्षांची झाली म्हणून दिली होती. या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक मुलांचे पालकही त्या ठिकाणी हजर होते. काही वेळाने मुलांना तिथेच सोडून ते निघून गेले. तर काहींनी रात्री उशिरा येऊन आपल्या मुलांना घरी नेले होते. अथर्व ७.३०च्या सुमारास घरी जात असताना त्याच्या मैत्रिणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंगल्याच्या गेटवरून उडी मारून खाली उतरला. त्याला रोखण्याच्या प्रयत्नात त्याची मैत्रीणही जखमी झाली. दोन दिवस खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.