मुंबई : लाचखोरीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)ने रंगेहात पकडलेला आरे दुग्ध वसाहतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड याच्याकडील उत्पन्नापेक्षा ५५५ टक्के अधिकची संपत्ती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. त्याने गैरमार्गाने तीन कोटी ३९ लाख ९ हजार ३८४ रुपये कमावल्याचे शुक्रवारी एसीबीकडून सांगण्यात आले.
राठोड याच्या आरे येथील सीईओ बंगल्याची झडती २४ मे २०२१ रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. ज्यात त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या प्रमाणाशी विसंगत रक्कम त्यांना सापडली. त्याने ही सगळी रक्कम गैरमार्गाने मिळवल्याचे देखील तपासात उघड झाल्याची माहिती एसीबीने २७ ऑगस्ट रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरे कॉलनीत एका घराच्या नूतनीकरणासाठी तक्रारदाराने परवानगी मागितली. त्यासाठी ५० हजारांची मागणी राठोडने केली. ही रक्कम घेताना त्याला एसीबीने पकडले होते.