आरेच्या शाळेची वेळ पालिकेच्या शाळा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बदलली!
By मनोहर कुंभेजकर | Published: January 6, 2024 08:21 PM2024-01-06T20:21:28+5:302024-01-06T20:21:39+5:30
10.30 ते 4.30 या वेळेत शाळा केल्याने विद्यार्थ्यांबर बिबट्याने हल्ला करण्याची पालकांची भीती.
मुंबई- आरे येथील आदिवासी पाड्यातील पालकांना आपल्या पाल्यांची शाळेची तयारी करुन पोटापाण्यासाठी कामावर जावे लागते. सदर शाळा मधल्या अधिवेशनात भरविल्यास बेस्ट प्रशासनाला आरे कॉलनी संकुलातील शाळेकरीता आरे कॉलनीचे खणलेले रस्ते, अरुंद रस्ते ह्यामुळे ट्राफिक जॅम होते. विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. सदर बेस्ट बसेस ट्राफिकमुळे उशीरा पोहोचतात. 10 मिनिटांच्या प्रवासासाठी 1 तास लागतो.
आरे कॉलनी संकुलातील शाळा प्रशासकीय अधिकारी कल्पना उंबरे यांच्या अट्टाहासामुळे 10.30 ते 4.30 या वेळेत करण्यात आली. त्यांनी लेखी आदेश न काढता तेथील मुख्याध्यापकांना दबाव टाकून कालपासूनच सुरू करण्यास सांगितले आहे व त्याप्रमाणे मधल्या सत्रात बसेस आल्या व उशीरा पोहोचल्या व हे रोजच होणार आहे ते आरे कॉलनीच्या ट्रॅफिक जॅममुळे विद्यार्थी व शिक्षक शाळेत वेळेवर पोहचू शकणार नाही.जर संध्याकाळी घरी परत जातांना विद्यार्थ्यांवर बिबट्याने हल्ला केला तर त्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी घेणार का? असा सवाल येथील पालकांनो केला.
आरे कॉलनीतील रहदारी सकाळी 8 नंतर खूपच वाढते. त्यामुळे सदर शाळा सकाळी 8 ते 2 या वेळेत करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
आरे कॉलनीत पालिकेची शाळा दुर्गम भागातील असून एकूण २७ आदिवासी पाड्यातील विद्यार्थी येथे शिकत आहेत. आदर्श नगर, मयूर नगर, युनिट क्र. ७,युनिट क्र. ५,युनिट क्र. २२ व मरोशी पाडा अशा सहा विभागातील मार्गिकेवर विशेष बेस्ट सेवा विद्यार्थ्यांच्या थेट निवासस्थानापासून शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरे कॉलनी मराठी क्र. २ या शाळेतील प्रकाश साळुंके या विद्यार्थ्यांवर 15 वर्षांपूर्वी पायी सायंकाळी शाळा सूटल्यावर घरी परतत असताना बिबट्याने प्राणघातक हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्यावर येथे बेस्ट सेवा सुरू करण्यात आली. ही बेस्ट सेवा मागील पंधरा वर्षांपासून सुरू आहे. आज आरे कॉलनीत रहदारी वाढली आहे. आरे कॉलनी शाळा ही युनिट क्र. १६ येथे असून तेथे विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी सकाळच्या सत्रात असणे योग्य असताना विनाकारण जबरदस्तीने मधले 10.30 ते 4.30 सत्रलादले गेले आहे. या शाळेतील पालकांनी त्यासाठी स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. कीर्तिकरांनी प्रशासकीय अधिकारी कल्पना उंबरे यांना पत्र लिहिले. त्यांना पाठविलेल्या पत्रात शाळेबाबत बदल करण्यात येणार नाही, स्थगिती दिली आहे असे नमूद केले असताना आरे कॉलनी शाळा संकुलातील मुख्याध्यापक व ईनचार्ज यांच्यावर जबरदस्तीने कोणताही अधिकृत रितसर आदेश न काढता बळजबरीने मधल्या सत्रात शाळा करण्यास भाग पाडले असा आरोप येथील पालकांनी केला.
स्थानिक पातळीवर कोणत्या समस्या आहेत हे लक्षात घेऊन त्यानुसार शाळा भरविणे हे हिताचे निर्णय घेणे आवश्यक असते. आज येथील शाळेत बहुसंख्य महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. मधल्या अधिवेशनात शाळा केल्याने विद्यार्थ्यांचा वेळ ट्राफिकमुळे वाया जात आहे. आज रहदारीच्या समस्येमुळे बेस्ट बसेस ११ नंतर विद्यार्थ्यांना घेऊन आल्या. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदरहू शाळा प्रशासकीय अधिकारी कल्पना उंबरे यांनी फेरविचार करुन सकाळी ८ ते २ या वेळेत करावी अशी मागणी येथील पालकांनी केली आहे.
आरे कॉलनी संकुलातील पूर्वी शाळेतील पटसंख्या ३,००० पेक्षा जास्त होती. त्यामुळे पूर्वी शाळा दोन अधिवेशनात भरत होती. शाळेची वेळ सकाळ अधिवेशनात ७.२० ते १२ पर्यंत व दुपार सत्रात १२.४० ते ५ अशी होती. इतर मनपा शाळेपेक्षा ४० मिनिटे ही वेळ त्या भागात बिबट्याचा वावर असल्याने कमी केली होती. आता पटसंख्या कमी झाल्याने दोन्ही सत्र एकत्र करुन ही शाळा एकाच अधिवेशनात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सकाळ अधिवेशनात ८ ते २ हीच वेळ असावी. जेणेकरून विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचतील व शाळा दुपारी २ वाजता सुटल्यावर निदान ३ पर्यंत घरी ट्राफिक असली तरी पोहोचतील.
- आनंदराय मोघा
आरे कॉलनी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते
पूर्वी या शाळेत सुमारे 4000 विद्यार्थी होते,आता विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. सदर निर्णय हा विद्यार्थ्यांचा हिताचा असून पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाने विद्यार्थी व पालक तर खुशच झाले आहे.पूर्वी दोन सत्रात शाळा भरत असल्याने जर शिक्षक गैरहजर राहिले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते,ते आता होणार नाही.आरेच्या 27 पाड्यातील विद्यार्थी हे परिसरात राहत असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच आपण सदर वेळेत बसेस वेळेवर सोडण्याबाबत बेस्ट अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली आहे.
- कल्पना उंबरे, प्रशासकीय अधिकारी, पी/दक्षिण विभाग