Join us  

आरेच्या शाळेची वेळ बदलल्याने विद्यार्थ्यांना होतो रोज लेट मार्क

By मनोहर कुंभेजकर | Published: January 11, 2024 6:19 PM

मुंबई -आरे कॉलनी संकुलातील शाळेतील बेस्टबस सुविधा विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी प्रमुख ६ आरे कॉलनीच्या विभागातून पंधरा वर्षांपासून सुरू करण्यात ...

मुंबई-आरे कॉलनी संकुलातील शाळेतील बेस्टबस सुविधा विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी प्रमुख ६ आरे कॉलनीच्या विभागातून पंधरा वर्षांपासून सुरू करण्यात आली होती. सदर महानगर पालिकेची शाळा दुर्गम भागात असल्याने व येथे बिबट्याचा असलेला वावर यामुळे ही बससेवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या हेतूने व आदिवासी पाडे आरे कॉलनी परिसरात दुर्गम भागात असल्याने ही बससेवा देण्यात आली होती. आरे कॉलनीतील टेकडीवर स्थित असलेल्या शाळेत एकूण पाच प्राथमिक व एक माध्यमिक अशा एकूण सहा शाळा असून सध्या १२०० विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. 

पूर्वी याच शाळेत चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थी होते त्यावेळी सदर शाळा दोन अधिवेशनात भरत होती. सकाळच्या अधिवेशनात वेळ ७.२० ते दुपारी १२ पर्यंत व दुपार सत्रात १२.४० ते ५ अशी होती. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने सदरहू शाळा दोन अधिवेशनात भरविण्याऐवजी गेल्या शुक्रवार पासून मधल्या अधिवेशनात शाळा १०.३० ते ३.५० ही वेळ करण्यात आली. पालक समिती तसेच शिक्षकांनी आरे कॉलनी संकुलातील ८ ते २ ही वेळ योग्य आहे असे पी दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी कल्पना उंबरे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच त्या संदर्भात येथील परिस्थितीही त्यांच्या लक्षात आणून दिली होती व सकाळी ८ नंतर रहदारी वाढल्याने विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचणार नाहीत हे सांगितले होते. तसेच दिंडोशी डेपोसही त्यांच्याकडे नेहमीच्या कामावर जाणाऱ्या प्रवाशांनाही पुरेसा प्रमाणात बेस्ट सुविधा उपलब्ध करून द्यावयाची जबाबदारी आहे.

 याबाबत पालकांनी स्थानिक खासदार गजानन किर्तीकर यांची भेटून याबाबत प्रश्न मांडला होता. त्यासंदर्भात त्यांनी उंबरे यांना पत्रही दिले होते. त्या पत्रास  मधल्या अधिवेशनात शाळा करण्याबाबतचा निर्णय स्थगित करण्यात आला असे कळविले. परंतू कोणताही प्रशासकीय आदेश न काढता त्यांनी विद्यार्थ्यांवर शाळा १०.३० ते ३.५० मधल्या सत्रात निर्णय लादला असा आरोप येथील पालकांनी केला.

 गेल्या शुक्रवार पासून आरे कॉलनीतील युनिट नंबर २२,खांबाचा पाडा, मरोशी पाडा, युनिट क्र. १३ या भागातील बेस्ट बसेस सकाळी शाळेत ११ नंतर विद्यार्थ्यांना घेऊन पोहोचत आहेत. तसेच शाळा दुपारी ३ वाजून ५० ला शाळा सुटते व बेस्ट बसेस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ४.३० ला पोहोचतात. सकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांचा १०-१५ मिनिटात होणारा प्रवासाला १ तास लागतो. विद्यार्थी त्यांच्या परिसरात बेस्ट बसेस सकाळी घेण्यासाठी वेळेत न आल्यास बसची वाट पाहून घरी परत जातात. बरेचश्या विद्यार्थ्याचे आई-वडील सकाळीच कामावर निघून जातात. शाळा उशिरा असल्याने विद्यार्थीही सकाळी उठण्यास तयार नसतात. विद्यार्थ्यांचा विनाकारण वेळ प्रवासात जातो. शाळेत तसेच घरीही दोन्ही वेळेस आरे कॉलनीच्या रस्त्यावर ट्राफिक असल्याने बसेस उशिरा पोहोचतात. शाळा ३.५० ला सूटते परंतु ४.३० पर्यंत बेस्ट बसेस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेत न आल्याने येथील बहुसंख्य महिला कर्मचारी वर्गास घरी जाण्यासाठी उशीर होतो.

विद्यार्थ्यांना व पालकांना सकाळची वेळ ८ ते २ ही वेळ योग्य असून प्रशासकीय अधिकारी  उंबरे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी येथील पालकांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई