Join us

सेनेच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म

By admin | Published: February 09, 2017 5:11 AM

भांडुपमध्ये एकाच प्रभागातून शिवसेनेच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिला गेल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

मनिषा म्हात्रे,  मुंबईभांडुपमध्ये एकाच प्रभागातून शिवसेनेच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिला गेल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. त्यात दोन्ही उमेदवार पक्षाच्या चिन्हासाठी अडून बसल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयुक्तांकडे नेण्यात आले. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचल्याने उमेदवारांचे चिन्ह थांबविण्यात आल्याची माहिती मिळते.भांडुप पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक १०९ मधून राजश्री राजेंद्र मांडविलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. याला विरोध करत याच प्रभागातून माजी नगरसेवक सुरेश शिंदे यांनीही त्यांच्या पत्नीसाठी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली होती. दोघांच्याही भांडणात या प्रभागाबाबत कोणाताही निर्णय काही होत नव्हता. अखेर पक्षाच्या या वॉर्डातील पदाधिकारी दीपाली गोसावी यासुद्धा उमेदवारीसाठी दावा करू लागल्या.एकीकडे उमेदवारीसाठी वाद सुरू असतानाच या वॉर्डातून राजश्री यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला. विभाग प्रमुख दत्ता दळवी यांच्या हस्ते फॉर्म देण्यात आले. अधिकृत उमेदवारी मिळताच जल्लोषात मिरवणूक काढत, राजश्री यांनी निवडणूक अधिकायाऱ्याकडे सेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजश्री यांची उमेदवारी रद्द करुन दिपाली गोसावी यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. माजी नगरसेवक सुरेश शिंदे यांची ही खेळी असल्याची चर्चा सुरू झाली. उमेदवारी रद्द करण्यात आल्याने राजश्री यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेतली. तेव्हाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे समजताच पक्षाने त्यांना अधिकृत अर्ज दिला. मात्र वेळ निघून गेल्यामुळे राजश्री यांचा अर्ज गृहीत धरण्यात आला नाही. त्यांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दिली . सुनावणी सुरू असल्याने दिपाली गोसावी यांचे चिन्ह थांबविण्यात आले होते.