'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 05:44 PM2023-06-20T17:44:32+5:302023-06-20T17:49:18+5:30
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती
मुंबई - शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगला राजकीय वैमनस्य आलं असून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर जबरी टीका करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रातील भाजप नेते आणि मंत्रीही टीका करतात. सध्या, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक कलगीतुरा सुरूच आहे. त्यातच, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हे मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना बाळासाहेबांची आठवण करून दिली. तसेच, आता ओरडण्यात काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी म्हटलं.
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे उत्तर देत उद्धव ठाकरेंना अर्धवटराव अशी उपमा दिली होती. आता त्याच अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. राज्यातील शिवसेना विरुद्ध भाजप नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व टीका टिपण्णी सुरू असतानाच मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
अनुराग ठाकूर हे दक्षिण मुंबईतील इंदु मिल येथे आले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होत असलेल्या स्मारक स्थळाला त्यांनी भेट दिली. यावेळी, मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. जे व्यक्ती अडीच वर्षे आपल्या घरातच बसून राहिली, आपल्याच कार्यकर्त्यांनाही ते भेटले नाहीत. म्हणूनच, त्यांना सत्तेतून खाली खेचायचं कामही त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलंय, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आपली विचारधाराही बदलली, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या विचारधारेचा विरोध केला, ज्यांविरुद्ध लढा दिला, त्यांच्याच मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले. अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत... असे म्हणत ठाकूर यांनी ठाकरेंना टोलाही लगावला. तसेच, अवघ्या जगाला माहिती आहे, भारताने तयारी केलेली कोरोनाची लस ज्या देशांना गरज होती, त्यांना मोफत दिली आहे.
लसीवरुन वार-पलटवार
मोदींनी लस तयार केली नसती तर कटोरा घेऊन उभे राहावे लागले असते असं फडणवीस म्हणतात, तुम्ही लोकांना मुर्ख समजता का? १७ कोटी लस दिल्या सांगता, मी मुख्यमंत्री असताना लस विकत घेण्याची तयारीही दाखवली होती. आम्ही पैसे देतो आम्हाला पाहिजे तेवढ्या लस द्या पण दिल्या नाहीत. तरीही आम्ही केंद्रावर दोषारोप केला नाही.