मुंबई - राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतर, काही वेळातच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या राजकीय पाठिंब्याला आमचं समर्थन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या राजकीय उलथापालथमुळे आता शिंदे गटाचे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचं स्वागत केलं असलं तरी त्यांची देहबोली आज वेगळीच होती. त्यावरुन, आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिंदेंना लक्ष्य करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे सर्व आमदार अपात्र ठरणार आणि राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपध घेतली. आता राष्ट्रवादीदेखील सत्तेत सामील झाली आहे. त्यावरुन संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास विकास आघाडी आता उरलीय का, असे म्हणत अजित पवारांसह त्यांच्या सर्व आमदारांचे स्वागत केले आहे. तसेच, त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांची देहबोली वेगळीच पाहायला मिळाली. त्यावरुन आता सोशल मीडियातही चर्चा रंगली आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. अब तेरा क्या होगा दाढिया... असे म्हणत अंधारे यांनी शिंदेंना लक्ष्य केलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत
"आजच्या शपथविधीचा अर्थ म्हणजे एकनाथ शिंदेंसह प्रथम 16 आणि नंतर सर्व आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची सुरुवात झाली आहे. यामुळेच भाजपने आता हे नवीन टेकू घेतलं आहे. कोणावर काय आरोप, काय खटले सुरू होते, यात मला पडायचे नाही. पण, यातले अनेक लोक असे आहेत, ज्यांच्याविरोधात भाजपने मोहिम राबवली होती. त्यांचे आता भाजप काय करणार, हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे फारकाळ मुख्यमंत्रिपदावर राहत नाहीत, त्यांचे आमदारही अपात्र ठरतील, हे आजच्या शपथविधीवरुन स्पष्ट होते," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.