Join us

मुंबईत शिक्षण आणि नोकरीसाठी येत असलेल्या तरुणांची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:06 AM

निखिल सावंतमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व्यवहार आता पूर्ववत होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मुंबईबाहेरील विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण ...

निखिल सावंत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व्यवहार आता पूर्ववत होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मुंबईबाहेरील विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण मुंबईत परतू लागले आहेत. त्यांना राहण्याच्या जागेची मोठी समस्या जाणवत आहे. ज्यांना स्वतंत्र घर किंवा जागा भाड्याने घेणे परवडत नाही, अशांसाठी असलेला हॉस्टेल, पेईंग गेस्ट आणि खानावळ यांचा पर्याय लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महागला आहे.

मुंबईत शिक्षण-नोकरीसाठी राज्यातील विविध भागांमधून विद्यार्थी येतात. मुंबईत महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. परंतु ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. गावाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांना नेटवर्कची मोठी समस्या जाणवते. तसेच इंटर्नशिपसाठीही मुंबईत उपलब्ध असणे सोयीचे असते. म्हणून मुंबई गाठणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. इथे आल्यावर हॉस्टेल, जागा, खानावळ, भली थोरली डिपॉझिट या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे बीडहून जानेवारी महिन्यात मुंबईत आलेल्या विकी सानप यांनी सांगितले. कॉलेजचे हॉस्टेल बंद असल्याने एक महिना जागा शोधण्यात गेला. त्या काळात मिळेल तिथे राहिलो. जागेसाठी ५० हजारांपासून एक लाखापर्यंत डिपॉझिट मागितले जात आहे. तेही परवडणारे नसल्याने अखेर दिवा येथे भाड्याच्या जागेचा पर्याय स्वीकारला. जागा मिळाली तरी जेवणाची समस्या आहेच. रोज हॉटलचे खाणे परवडत नाही. सध्या एका वेळच्या थाळीला ७० रुपये मोजतो आहे, असे सानप म्हणाले.

नांदेडच्या आष्टूरहून आलेले राजकिशोर ससाणे यांनाही अशीच समस्या भेडसावत आहे. मुंबईबाहेर राहायचे म्हणजे प्रवास खर्च वाढतो. त्यात रेल्वेचा प्रवास मर्यादित काळासाठी खुला आहे. बसने ये-जा करायची म्हणजे तेवढा खर्च वाढतो. लोकलच्या वेळा तरी किमान वाढवाव्यात, अशी मागणी ससाणे यांनी केली आहे.

विद्यार्थी संघटनांकडे याबद्दलच्या तक्रारी येत आहेत. आम्ही आमच्या परीने त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहोत, अशी माहिती नॅशनल स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष दादाराव नांगरे यांनी दिली. त्यांना स्वत:लाही जागा आणि खानावळ मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली. एक महिना जे मिळेल ते खाल्ले, प्रसंगी उपाशी राहिलो, असेही नागरे यांनी सांगितले.