Join us

आदिवासी वाड्या सुविधांपासून वंचित

By admin | Published: January 29, 2015 10:49 PM

उरण परिसरातील आदिवासी वाड्यातील आदिवासींना न्याय्य हक्क मिळावा या मागणीसाठी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी आदिवासींच्या साथीने

उरण : उरण परिसरातील आदिवासी वाड्यातील आदिवासींना न्याय्य हक्क मिळावा या मागणीसाठी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी आदिवासींच्या साथीने प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोरच आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात शासनाने ५ फेब्रुवारी रोजी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर आमरण उपोषण तूर्तास मागे घेण्यात आल्याची माहिती वैजनाथ ठाकूर यांनी दिली.स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही उरण परिसरातील अनेक आदिवासी वाड्या वीज, पाणी, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून कायम वंचितच राहिल्या आहेत. आदिवासींना न्याय्य हक्क मिळावा या मागणीसाठी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शासनाला दिला. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत काढण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली होेती. यासंदर्भात अनेक वर्षांपासून विविध सरकारांचे लक्षही वेधण्यात आले. मात्र कोणत्याही सरकारला आदिवासींबाबत दयेचा पाझर फुटला नसल्याचा गंभीर आरोपही राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी पत्रातून केला होता. (वार्ताहर)